काळजी घ्या! महिलांमध्ये वाढतोय हृदयरोग  File Photo
पिंपरी चिंचवड

काळजी घ्या! महिलांमध्ये वाढतोय हृदयरोग

हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण 15 टक्के

पुढारी वृत्तसेवा

दीपेश सुराणा

पिंपरी: शहरातील तीस ते पन्नास वयोगटातील महिलांमध्ये सध्या हृदयरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. हृदयविकाराच्या झटक्याचे महिलांमधील प्रमाण हे 15 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे निरीक्षण हृदयरोग तज्ज्ञांनी मांडले आहे.

महिलांच्या जीवनशैलीत झालेला बदल, हार्मोनल बदल, धूम्रपान आणि मद्यपान, गर्भधारणेदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंती, ताणतणाव आदी प्रमुख कारणे त्यासाठी कारणीभूत आहेत.हृदयरोग प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांमध्ये आढळणारा आजार मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्येदेखील हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे.

अहवाल आणि जर्नलच्या अभ्यासाचे निष्कर्ष

इंडियन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, देशातील 3 पैकी 1 महिला हृदयरोगामुळे मृत्यू पावते. 50 वर्षांखालील महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता पुरुषांच्या दुप्पट आहे. 2022 मध्ये अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, गेल्या दशकात 35 ते 50 वयोगटातील भारतीय महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण 15 टक्के वाढले आहे.

प्रमुख लक्षणे

  • छातीत दुखणे, जड वाटणे, धडधडणे

  • अनपेक्षित थकवा, चालताना दम लागणे

  • श्वास घेण्यास त्रास

  • मळमळ, चक्कर येणे, भोवळ येणे

  • जबडा, मान किंवा पाठीमध्ये वेदना

  • डावा हात, डावा खांदा दुखणे

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • नियमित आरोग्य तपासणी: रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यांची वार्षिक तपासणी करावी

  • पोषक आहार: आहारामध्ये जास्त प्रमाणात फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करावा

  • सक्रिय जीवनशैली: दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करावी

  • ताणतणाव व्यवस्थापन: ताणतणाव व्यवस्थापन करावे. त्यासाठी योगासने, ध्यानधारणा आणि समुपदेशन यांची मदत घ्यावी

  • हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान सोडायला हवे

  • पुरेशी झोप घ्यावी. तसेच, सकारात्मक विचारपद्धतीचा अवलंब करावा

महिलांमध्ये हृदयरोग वाढण्याची कारणे

  • जीवनशैलीतील बदल : कामाच्या तणावामुळे, अनियमित आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारखे जोखमीचे घटक वाढत आहेत.

  • धूम्रपान आणि मद्यपान : गेल्या दशकात देशातील महिलांमध्ये धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही 25 टक्क्यांनी वाढला आहे.

  • हार्मोनल बदल : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा विकार 5 पैकी 1 भारतीय महिलांमध्ये आढळतो. तो उच्च रक्तदाब व चयापचयाच्या समस्यांना कारणीभूत ठरतो.

  • गर्भधारणेदरम्यान निर्माण होणार्‍या गुंतागुंती : गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि गर्भावस्थेतील मधुमेह यामुळे भविष्यात हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

  • मानसिक आरोग्य आणि ताणतणाव : महिलांमध्ये ताणतणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या दुर्लक्षित केल्या जातात. मात्र, या हृदयरोगाचे महत्त्वाचे कारण आहेत.

  • लक्षणांकडे दुर्लक्ष आणि उशिरा निदान : महिलांना थकवा, श्वास घेण्यास त्रास किंवा सौम्य वेदना यासारखी लक्षणे जाणवतात. मात्र, ही लक्षणे दुर्लक्षित केली जातात.

महिलांनी हृदयरोग टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली आत्मसात करावी. नियमित व्यायाम, वार्षिक वैद्यकीय तपासणी करायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे, गोळ्या घ्याव्या. पुरेशी झोप घ्यावी. ताणतणावाचे व्यवस्थापन करावे. त्यासाठी योगासने, ध्यानधारणा यांचा अवलंब करावा. तसेच, लक्षणे आढळल्यास त्याचे त्वरित निदान करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्या.
- डॉ. रणजित मोरे, हृदयरोग तज्ज्ञ
महिलांनी स्वतःचे आरोग्य कसे जपता येईल, यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यासाठी जागरुकता वाढवून हृदयरोग टाळण्यासाठी वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्या. विविध अभ्यासांतील निष्कर्षानुसार हृदयविकाराच्या झटक्याचे महिलांमधील प्रमाण हे 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
- डॉ. राजीव सेठी, संचालक आणि वरिष्ठ सल्लागार, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT