जुगार खेळण्याच्या नादामुळे तरुणाने आपली पाच एकर जमीनची विक्री केली. तसेच, जुगार खेळण्यासाठी पैसे कमी पडू लागल्याने सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी केली. बहिणीच्या घरातून साडेबारा तोळे सोने चोरून नेले. त्यानंतर बहिणीसोबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठीदेखील गेला. मात्र, संशय आल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीकांत दशरथ पांगरे (29, रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीमधून भर दिवसा साडेबारा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला गेला. यातील फिर्यादी महिला मेडिकल दुकान चालवीत असून त्यांचे पती नोकरीसाठी दिवसभर बाहेर असतात. त्यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून त्यांचा भाऊ राहण्यासाठी आला होता.
तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. घरात कोणतीही तोडफोड झाली नसल्याने ही चोरी घरातीलच सदस्याने केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी श्रीकांत पांगरे याच्याबद्दल माहिती घेतली. श्रीकांत याला जुगार खेळण्याची सवय आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेत जमीन विकून त्यातून मिळालेले पैसे जुगारात हरले. त्यानंतर जुगारात हरलेली रक्कम पुन्हा ऑनलाईन जुगार खेळून लोकांची उधारी देण्यासाठी तो पुण्यामध्ये आला. चिंचवड मध्ये बहिणीच्या घरी राहून तो डिलिव्हरी बॉयचे देखील काम करत होता. त्याने 13 जानेवारी रोजी घराचा मागील दरवाजा कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने उघडा ठेवला.
त्यानंतर दुपारी घरी कोणी नसताना त्याने साडेबारा तोळे वजनाचे दागिने चोरले. चोरी करून तो गावी जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, पोलिस अंमलदार जयवंत राऊत, देवा राऊत, अतिश कुडके यांनी केली.