आरोग्यास अपायकारक पदार्थाची विक्री करण्यास बंदी Pudhari
पिंपरी चिंचवड

राज्यात गुटखा बंदी; मात्र रेल्वेत सर्रास विक्री

पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात तंबाखूजन्य मावा व गुटखा विक्रीला बंदी असताना परराज्यातून तो मोठ्या प्रमाणात आणला जातो. आरोग्यास अपायकारक पदार्थाची विक्री करण्यास बंदी असताना, रेल्वेच्या डब्यांमध्ये याची सर्रास विक्री होताना दिसून येत आहे. गुटखा पाकिटांच्या माळा विक्रेते चक्क गळ्यात टाकून सर्रास विक्री करीत असल्याचे दिसून येते. हे पाहून प्रवाशांना अचंबा होत आहे. या सर्व प्रकाराकडे रेल्वे पोलिसांची डोळेझाक होत असल्याची चर्चा प्रवाशांमधून होत आहे.

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असूनही परराज्यामधून मोठ्या प्रमाणात माल आणला जातो. अन्न व औषध प्रशासन विभाग अशा रितीने होत असलेल्या अनधिकृतपणे गुटखा व मावा विक्री रोखण्यात काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. शहरात जागोजागी थाटलेल्या विविध टपर्‍या आणि दुकानांमध्ये गुटख्यांची सर्रास विक्री होत आहे. यासोबतच वाहतूक सेवेतील सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या रेल्वेमध्येदेखील गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याने बंदी केवळ कागदावरच असल्याची चर्चा प्रवाशांमधून होत आहे.

प्रवाशांची आरोग्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. रेल्वे आणि स्थानक परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे बेकायदा आहे. अशा पदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांची 139 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करावी. अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
- प्रियंका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे विभाग.

याबाबत रेल्वे पोलिस आणि शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय शोधणे महत्त्वाचे बनले आहे. तरुण पिढीच्या हाती सहजासहजी गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ हाती येत असल्याने आरोग्यास धोकादायक अशा पदार्थाचे सेवन तरुणांकडून मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

एकीकडे गुटखा विक्री करणार्‍या टपरीधारकांवर मोठी कारवाई केली जाते; मात्र दुसरीकडे काही विक्रेते आपले रोजगाराचे साधन म्हणून तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा विभागाने याबाबत डोळेझाक न करता या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT