उर्से मावळ: पवन मावळमधील शेतकरी सध्या गोल्डन मका या पिकाची शेती मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. ही मका बाहेर देशात जात असल्याने याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांमध्ये एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
गोल्डन मक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला जास्त पाण्याची गरज लागत नाही. महिन्यात चार वेळा पाणी दिले जाते. तसेच या पिकासाठी शेतकर्यांना मेहनतही कमी प्रमाणात करावी लागते. या पिकामध्ये तण उगवले तर ते काढले नाही तरी चालते त्यामुळे खुरपणीची मेहनत कमी होते.
गोल्डन मक्याचे एका एकरात जवळपास सातशे किलो ते एक टन उत्पन्न एकावेळी मिळते. एका हंगामात याचा दोन ते तीन वेळा तोडा होतो. 30 ते 40 दिवसांत एक तोडा म्हणजे 90 दिवसांच्या एका हंगामात तीन वेळा अशा प्रकारे उत्पन्न मिळते.
एकरी 80 हजार उत्पन्न
या पिकासाठी एकरी बियाणे, खते व इतर खर्च मिळून 17 ते 20 हजार रुपये खर्च येतो. तर एकरी उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये मिळते. तसेच कणसाचा तोडा झाल्यानंतर शिल्लक कडब्यापासून 20 ते 30 हजार उत्पन्न मिळते, असे जवळपास एक लाखापर्यंत या पिकापासून उत्पन्न मिळते.
उन्हाळ्यात जवळजवळ दोनदा हे पीक घेता येते, तर नंतर याच जमिनीत इतर पिके घेता येतात म्हणजे वर्षभरात विविध पिके शेतकर्यांना घेता येतात. त्यामुळे उन्हाळ्यात पवन मावळमधील शेतकर्यांना गोल्डन मक्याच्या शेतीचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे
गोल्डन मका पिकाचा हंगाम 90 दिवसांचा असतो. या पिकाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. या मालाची बाहेर देशात चांगली मागणी आहे. त्यामुळे कंपनी शेतकर्यांबरोबर करार करते आणि स्वतः कंपनी शेतकर्यांच्या शेतातून तोडा करून माल घेऊन जाते. त्यामुळे शेतकर्यांना बाजारपेठ व ग््रााहक शोधावे लागत नाहीत, तसेच या पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. तसेच अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक बदलांचा परिणाम होत नाही. त्यामुळे हे पीक शेतकर्यांसाठी खूप फायदेशीर ठरते आहे.- शाम दळवी, शेतकरी,