Traditional Gas Stove Pudhari
पिंपरी चिंचवड

Gas Cylinder Shortage: गॅसटंचाईमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये चुली पेटल्या; उद्योग, हॉटेल, मेस अडचणीत

सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत; महिलांचा चुलीकडे कल, लघुउद्योगांतील शिफ्ट बंद

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे महिलावर्ग आता चूल पेटवून स्वयंपाक करायला लागल्या आहेत. शहरातील फ्लॅटधारकांना तर चूल पेटविणे शक्य नाही. त्यांनी इंडक्शनचा आधार घेतला आहे. मात्र, ज्यांची बैठी घरे आहेत. त्यांनी स्वयंपाकासाठी चुलीचा वापर सुरू केला आहे. काही खाणावळ आणि मेसवालेदेखील सिलिंडर संपल्यानंतर चूल पेटविणार असल्याचे सांगत आहेत. शहरातील काही नागरिक आजही अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी चुलीचा वापर करताना दिसतात. सध्या गॅसटंचाईमध्ये हीच चूल त्यांचा फार मोठा आधार बनताना दिसत आहे. महिला घराच्या मागच्या बाजूला चूल पेटवून आता स्वयंपाकही करायला लागल्या आहेत. इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन आणि गॅसपुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम भारतात गॅसटंचाई आणि दरवाढीच्या रूपाने दिसून येत आहे.

आखाती देशातील युद्धाच्या वातावरणापूर्वी शहर आणि परिसरातील खवय्यांमध्ये चुलीवरच्या जेवणाची क्रेझ होती; मात्र आता युद्धाची झळ शहरात जाणवू लागली आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद केल्याने हॉटेल तसेच खाणावळीचालकांना आता चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये खवय्यांची संख्यादेखील मोठी आहे. विविध भागांत मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आणि खाणावळी सुरू आहेत. येथे कामासाठी येणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि व्यावसायिकांमुळे खवय्यांची संख्या मोठी आहे. परंतु, अलीकडील गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे अनेक हॉटेलचालकांनी पारंपरिक चूलीचा पर्याय स्वीकारला आहे.

केंद्र व राज्य सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असे उपाय तातडीने करावेत. तसेच गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवून दरवाढीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
नीता परदेशी, संस्थापक अध्यक्ष, वुमेन्स हेल्पलाइन फाउंडेशन)
आमची जवळपास 60 ते 70 लोकांची मेस आहे. माझ्याकडे जो सिलिंडर आहे तो मला दोन दिवस पुरणार आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे आमच्या मेसच्या पाठीमागे असलेल्या जागेत आम्ही चूल मांडणार आहोत. जेणेकरून आमचा व्यवसाय सुरू राहील आणि लोकांचीहीदेखील खाण्याची अडचण होणार नाही.
श्यामल जगताप (मेस चालक)

हॉटेलमध्ये मेन्यू मर्यादित

गॅसटंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेलांनी स्वयंपाकाचे मेन्यू मर्यादित केले आहेत. काही हॉटेलांनी चायनीज आणि साउथ इंडियन पदार्थ बनवणे बंद केले आहे, तर काही ठिकाणी हॉटेल तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे. गॅसच्या अभावामुळे हॉटेल व्यावसायिक इंडक्शन, इलेक्ट्रिक ओव्हन, फायर किंवा कोळशाच्या भट्‌‍ट्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या पर्यायांमुळे खर्च वाढत असून व्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

घरगुती सिलिंडर गैरवापर वाढण्याची भीती

व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याचा फायदा घेऊन काही ठिकाणी घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या अवैध रिफिलिंगमुळे घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अवैध गॅस रिफिलिंग, साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर छापेमारी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चुलीवर खाद्यपदार्थ बनविणे वेळखाऊ असले तरी त्यातून मिळणारी चव वेगळीच असते. त्यामुळे गॅस टंचाईच्या काळातही ग््रारिक जेवणाचा अनुभव देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुमीत गोरवे, हॉटेल चालक.

कारखान्यातील एक शिफ्ट बंद

युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून औद्योगिक गॅसपुरवठा कमी करण्यात आला आहे. परिणामी, केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर मावळ आणि मुळशी पट्ट्यातीलदेखील काही छोटे व्यापारी, उद्योजक अडचणीत सापडले आहेत. औद्योगिक सिलिंडर बंद आहे. तर, शहरात भूमिगत पाइपालाइन नाही. त्यामुळे जवळपास सात ते आठ हजार लघु व सूक्ष्म उद्योजकांना त्याचा थेट फटका बसला आहे. उत्पादन घटल्याने अनेक उद्योजकांनी एक शिफ्ट बंद केली आहे. पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक पट्टयातील अनेक कंपन्या या एकमेकांवर अंवलबून आहेत. अनेक लघुउद्योजक मोठ्या कंपन्यांना कच्चा माल व इतर वस्तू पुरवतात. अगदी वेल्डिंगपासून ते पावडरकोटिंग म्हणजेच मुख्यतः फिनिशिंग वर्कचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटले. परिणामी, अनेक उद्योजकांनी तीन शिफ्टचे काम दोनवर आणले आहे. तर, काहींनी एकच शिफ्ट सुरु केली आहे. यापूर्वी जीएसटी, नोटाबंदी, महागाई, कोरोना काळात उद्योजकांचे मोठे नुकसान झाले. त्यात आता कुठे उद्योग सावरत असताना, पुन्हा गॅसच्या पुरवठ्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.

कामगारांचा खर्च पेलवेना

उद्योग व्यवसाय चालविण्यासाठी उद्योजकांकडे 10 ते 50 च्या संख्येत कामगार आहे. अनेक परराज्यातील कामगारांना राहण्यापासून ते जेवणाची व्यवस्था उद्योजक करतात. पण, गॅसचा तुटवडा झाल्याने या कामगारांची उपासमार होते आहे. परिणामी, उद्योजकांना इलेक्ट्रीक गॅसची शेगडी ऑर्डर करावी लागली. 15 ते 50 हजार अशा पट्टीत ती शेगडी उपलब्ध आहे. त्याचा खर्च वाढत असल्याचे व्यापारी सांगतात.

ग््राामीण पट्ट्यात फटका

मावळातील अनेक उद्योजकांनादेखील याचा फटका बसला आहे. निर्यातक्षम माल कारखान्यांत आणि बंदरांवर अडकून पडला आहे. तयार माल वेळेवर न पाठविल्याने व पाठवूनदेखील तो पुढे जाता आला नाही. यात अगदी फळ, फुलांपासून ते विविध वस्तू आहेत. उद्योजकांपुढे पेच निर्माण झाल्याने त्या संलग्न वाहतूक, कामगार आणि छोट्या कंपन्यांनाही झळ बसली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT