नवलाख उंबरे: मुसळधार पावसामुळे आणि पीओपीवरील शासन निर्णय उशिरा झाल्यामुळे यावर्षी मूर्तिकारांची चांगलीच धावपळ दिसत आहे. गणेशोत्सव जसा जवळ येतो आहे, तशीच मूर्ती कलाकारांची लगबग वाढली आहे. नवलाख उंबरे परिसरात मूर्तिकार गणेशमूर्ती बनविण्यात दंग दिसत आहेत.
पावसामुळे मूर्ती बनिवण्यात अडचणी
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या आगमनासाठी घराघरांतून मोठ्या उत्साहाने तयारी सुरू झाली आहे. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आपल्या घरात बाप्पा नवनव्या रूपात पाहायचा असतो. या वेगवेगळ्या आणि खास मागण्यांमुळे मूर्तिकारांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. (Latest Pimpri News)
यंदा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींवर बंदी उशिरा उठविल्यामुळे अनेक कलाकारांना चांगलीच धावपळ करावी लागली. त्यातच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाडूच्या मूर्ती बनवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वेळेवर मूर्ती पूर्ण करणे हे कलाकारांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
पीओपी मूर्तींना अधिक मागणी
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींची मागणी अधिक असल्याचे चित्र असून, विशेषतः मध्यम आकाराच्या पीओपी मूर्तींना अधिक मागणी आहे. काही मंडळांनी मात्र पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीला पसंती दिली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर आला असताना कलाकारांचे हात थांबलेले नाहीत. आपल्या कलेतून भक्तांचे श्रद्धास्थान उभे करण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम करत आहेत. बाप्पा येताहेत! या आनंदाच्या सादेसोबतच कलाकारांचा घाम आणि मेहनत या सणाला अधिक अर्थपूर्ण बनवते.
ग्राहकांना यंदा नवे डिझाईन्स हवे आहेत. कोणाला कृष्णावतारातील बाप्पा हवेत, तर कोणाला संगीतावर आधारित मूर्ती. अशा कल्पनांची पूर्तता करताना आम्ही दिवस-रात्र मेहनत करत आहोत.- पांडुरंग दरेकर, मूर्तिकार