संतोष शिंदे
सनातन धर्मामध्ये महाकुंभ मेळाव्याला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. 13 जानेवारी ते 26 फेब—ुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे होणार्या महाकुंभ मेळाव्यात कोट्यवधी भाविक सहभागी होतील; मात्र याचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबले आहेत. बनावट वेबसाइट्स, खोटे कॉल्स आणि खोट्या बुकिंग सुविधांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
केवळ अधिकृत संकेतस्थळांवरूनच बुकिंग करा.
संशयास्पद फोन कॉल्स, ईमेल किंवा मेसेजेसकडे दुर्लक्ष करा.
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
फसवणुकीसंदर्भात पोलिसांशी संपर्क साधा.
फसवणुकीची पद्धत
महाकुंभसाठी खास डिझाइन केलेल्या, अधिकृत संकेतस्थळांशी मिळतीजुळती वेबसाइट तयार करून, नागरिकांना कमी किमतीत बुकिंग देण्याचे आश्वासन दिले जाते. पैसे भरल्यानंतर या वेबसाइट्स अचानक बंद केल्या जातात.
फसवे कॉल्स :
थेट नागरिकांना कॉल करून ‘महाकुंभ विशेष ऑफर’ सांगितली जाते. यात कमी किमतीत राहण्याची सुविधा, प्रवास आणि इतर सुविधा देणार असल्याचे सांगून पैसे उकळले जातात.
आकर्षक संदेश :
ई-मेल, ‘एसएमएस’ किंवा सोशल मीडियाद्वारे संशयास्पद लिंक पाठवून नागरिकांना फसवले जाते.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाकुंभसाठी प्रवास करणार्या नागरिकांना अधिकृत संकेतस्थळांवरूनच बुकिंग करण्याचा सल्ला दिला आहे. फसवणुकीसंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर किंवा cybercrime. gov. in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
भाविकांच्या भावनांशी खेळ
महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. कोट्यवधी लोक कुंभमेळ्यास हजेरी लावतात. या गर्दीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्याचे नवनवीन मार्ग शोधले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.