Eco-friendly products from flower waste
मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील भक्तांनी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला. गणरायाच्या पूजेसाठी हार, फुले व माळ्याचा वापर झाला. त्या निर्माल्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपोस्ट खत तयार केले.
महापालिकेकडून यंदा प्रायोगिक तत्वावर निर्माल्यातून फुले वेगळी करून सुगंधी पावडर, धूप कांडी, धूप कोन, अगरबती तयार करण्यात येत आहेत. त्या माध्यमातून गणेशोत्सवातील निर्माल्याच्या पुनर्वापरातून पूजेसाठी लागणारा धूप, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ सर्वत्र पसरणार आहे. (Latest Pimpri News)
पिंपरी-चिंचवड शहरात पाच हजारांपेक्षा अधिक लहान व मोठी तसेच, हाऊसिंग सोसायटींचे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. तसेच, सुमारे दोन लाखांपर्यंत घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवात भाविक बाप्पाची मनोभावे पूजा करतात. दररोज हार, फुले, माळा बाप्पाला वाहिले जाते. हे निर्माल्य महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व विसर्जन घाटावर जमा केले. नदी, तलाव आदी ठिकाणी निर्माल्य टाकण्यास मज्जाव करण्यात आला.
शहरभरातून अकरा दिवसांत तब्बल 256 टन निर्माल्य जमा झाले. ते सर्व मोशी डेपोत पाठविण्यात आले. तेथे त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात आले आहे. ते खत उद्यान, बाग, हाऊसिंग सोसायटीतील हिरवळ, शेतीसाठी अल्पदरात विकले जाते. यंदा प्रथमच महापालिकेने प्रायोजिक तत्वावर निर्माल्यातील 500 किलो फुले बाजूला काढून ती दापोडी येथील अल्फा फेडरेशन महिला बचत गटाला दिली आहेत.
त्या बचत गटाने झेंडू, शेवंती व गुलाब या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या सुकविल्या. सुकलेल्या पाकळ्या कुटून त्यापासून सुंगधी पावडर व धूप बनविण्यात येणार आहे. गणेशाच्या निर्माल्यातून तयार झालेले धुपातून सर्वत्र सुगंध दळवणार आहे. महापालिकेच्या या टाकाऊतून पर्यावरणपूरक उपक्रमांचे शहभरात कौतुक होत आहे. या माध्यमातून महिला बचत गटांच्या महिलांना रोजगारही मिळत आहे.
मार्केटमध्ये धूप विक्री
दापोडी रेल्वे स्टेशनजवळ महापालिकेचे शून्य कचरा केंद्र आहे. दापोडी परिसरात निर्माण झालेला कचरा तेथे जिरवला जातो. त्या ठिकाणी अल्फा फेडरेशन या महिला बचत गटाने निर्माल्यातून 500 किलो झेंडू, शेवंती व गुलाबाची फुले घेतली आहेत. फुल्यांच्या पाकळ्या काढून सुकवण्यात येत आहेत.
त्यानंतर त्यापासून सुगंधी पावडर, धूप कांडी, धूप कोन, अगरबती तयार करण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारचे धूप राज्यभरातील 11 देवस्थानाला विकण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्योग समुहाशी चर्चा झाली आहे.
बचत गटाच्या राखी धर, संगीता कांबळे, सुरेखा कांबळे, माया कांबळे, सरिता गायकवाड, बबिता सरवदे, सुलभा थोरात, सोनम जेटिथोर, राजश्री कोळी, रिटा फर्नाडिस या महिला काम करीत आहेत. या उपक्रमास महापालिकेच्या समाज विकास विभाग व आरोग्य विभागाच्या प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे, असे समाज विकास विभागाच्या समुह संघटक वैष्णवी लगाडे यांनी सांगितले.
निर्माल्यापासून अगरबत्ती :
शहरात दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. त्यापासून वेगवेगळ्या सुगंधांच्या व प्रकारच्या आगरबती बनविण्याचा विचार महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. ते काम शहरातील महिला बचत गटांकडून केले जाणार आहे. त्या अगरबत्या बाजारपेठेत विकून महिलांना रोजगार निर्माण होणार आहे. तसेच, निर्माल्याचा पुनर्वापर होणार आहे. त्यासाठी आवश्यक जागा, प्रकल्पाची उभारणी, यंत्रसामुग््राी आदींबाबत नियोजन सुरू आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिला बचत गटांचे सक्षमीकरण
गणेशोत्सवात जमा झालेल्या 256 टन निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात आले आहे. यंदा प्रायोगिक तत्वावर 500 किलो फुले दापोडीतील एका महिला बचत गटास देण्यात आली आहेत. त्यापासून सुगंधी पावडर व धूप तयार करण्यात येत आहे. त्या नव्या उपक्रमातून बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
जलप्रदूषणास अटकाव
गणेशोत्सवात नदी व तलावात निर्माल्य टाकल्याने जलप्रदूषण होते. यंदा निर्माल्य नदी व नाल्यात टाकण्यास 100 टक्के अटकाव करण्यात आला. विर्सजन घाटावरील कुंडात निर्माल्य जमा करण्यात आले. त्यामुळे नदी प्रदूषण कमी होण्यास सहाय झाले. तसेच, निर्माल्याचा पुनर्वापर करण्यात येत असल्याने पर्यावरणहित जपण्यात आले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.