फुफ्फुसात पाच स्क्रू  Pudhari
पिंपरी चिंचवड

अबब..! इलेक्ट्रिशियनच्या फुफ्फुसात पाच स्क्रू

दोन स्क्रू 48 तासांमध्ये शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर पडले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे बसवत असताना, उघड्या विद्युत तारेला पाय लागून 19 वर्षीय इलेक्ट्रिशियनला जोरदार शॉक बसला. त्यामुळे खाली पडून बेशुद्ध झाल्याने त्याने तोंडात धरलेले पाच स्क्रू फुफ्फुसात गेले आणि दोन स्क्रू त्याने गिळले. फुफ्फुसातील पाच स्क्रू फ्लेक्सिबल ब—ॉन्कोस्कोपीद्वारे काढण्यात आले. तर, पोटात गेलेले दोन स्क्रू 48 तासांमध्ये शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर पडले. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकला.

पिंपरी येथील डीपीयू सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही दुर्मिळ वैद्यकीय घटना यशस्वीपणे हाताळली. रुग्णाच्या फुफ्फुसात अडकलेले पाच आणि गिळलेले दोन असे एकूण सात मेटल स्क्रू शरीराबाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. संबंधित इलेक्ट्रिशियन एका ठिकाणी फॉल्स सीलिंगसाठी अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे बसवत होता. त्या वेळी उघड्या विद्युत तारेला पाय लागून त्याला जोरदार शॉक बसला. त्यामुळे तो खाली पडला आणि काही काळ बेशुद्ध झाला. याच दरम्यान, त्याने कामादरम्यान तोंडात धरलेले पाच स्क्रू त्याच्या फुफ्फुसात गेले आणि दोन स्क्रू त्याने गिळले.

सुदैवाने श्वसननलिकेला गंभीर दुखापत नव्हती

शुद्धीवर आल्यानंतर, त्याला 2 ते 3 मिनिटे तीव— खोकला, छातीत वेदना आणि श्वास घेण्यास अडथळा जाणवू लागला. डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे काढल्यावर फुफ्फुसात पाच आणि पोटात दोन स्क्रू असल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने, स्क्रू मुळे श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाली नव्हती.

फ्लेक्सिबल एअर-वे तंत्राचा वापर

त्याला डीपीयू सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल केले होते. येथील प्राध्यापक व श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बर्थवाल आणि त्यांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली हे स्क्रू काढण्यासाठी सखोल नियोजन केले. कमी खर्चिक आणि कमी त्रासदायक असलेल्या फ्लेक्सिबल एअर-वे तंत्राचा त्यासाठी वापर केला. तसेच, ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तीन तास चाललेली प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक ठरली. सर्व पाच स्क्रू डाव्या फुफ्फुसाच्या वरच्या भागातील श्वसनलिकेत अडकले होते. रुग्णाला भूल देऊनही त्याला होणार्‍या सततच्या खोकल्यामुळे त्याच्या स्थितीत बदल होत होता. विशेष रॅट-टूथ आणि डॉर्मिया बास्केट फोर्सेप्ससारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने सर्व पाच स्क्रू यशस्वीपणे काढण्यात आले. प्रक्रियेदरम्यान, एक स्क्रू ओरोफॅरिंक्समध्ये सरकून रुग्णाने गिळला. मात्र, पुढील 48 तासांत पोटातील दोन स्क्रू नैसर्गिकरित्या बाहेर पडले.

ही केस केवळ तिच्या गुंतागुंतीमुळेच महत्त्वाची नाही, तर फुफ्फुसातील पाच स्क्रू फ्लेक्सिबल ब—ॉन्कोस्कोपीद्वारे काढण्याचा हा देशातील क्वचितच नोंद झालेला प्रकार आहे. या प्रक्रियेमुळे मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टळली. तसेच रुग्णाच्या उपचाराचा खर्च आणि पुनर्प्राप्तीचा कालावधी कमी झाला.

डॉ. एम. एस. बर्थवाल म्हणाले, की या असाधारण परिस्थितीचे आमच्या वैद्यकीय टीमने कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केले. रुग्णाचा जीव वाचविल्याचा आम्हाला अभिमान आहे. फुफ्फुसात पदार्थ अडकण्याची घटना प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक आढळतात, ज्यामध्ये सामान्यतः दाणे, द्राक्षे, नाणी, पिन आणि मणी असतात. प्रौढांमध्ये हाडांचे तुकडे, सुपारीचे तुकडे, मटार आदी पदार्थ सामान्यतः दिसून येतात. मात्र, पाच स्क्रू फुफ्फुसात जाण्याची घटना देशात अद्याप नोंदवलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT