पाटा-वरवंटा pudhari
पिंपरी चिंचवड

अखेरची घरघर..! पाटा-वरवंटा बनविण्याची कला लुप्त होण्याची भीती

चरितार्थ कसाबसा चालवणार्‍या समाजाला शेवटची घरघर

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी : हल्ली पिठाच्या गिरण्या, मिक्सरच्या युगात जातं, पाटा-वरवंटा यांना मागणी कमी झाली आहे. तरीदेखील आमचा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय लुप्त व्हायला नको म्हणून आम्ही आजही गेली 40 ते 50 वर्षांपासून दगडापासून वस्तू बनविण्याचे काम करत आहे, अशी भावना व्यक्त केली चिंचवड स्टेशन येथे रस्त्याच्या कडेला खलबत्ते, जातं, पाटा - वरवंटा साकारणार्‍या रमेश धोत्रे यांनी.

लहान मोठ्या दगडांना कधी छन्नी आणि हातोड्याने आकार देत बसलेला वडार समाजाने आजच्या डिजिटल युगात आपला परंपरागत व्यवसाय जपला आहे. शहरातील निगडी आणि चिंचवड स्टेशन येथे रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या छताचा आडोसा करून ऊन - पावसातही हा समाज दगडांना आकार देत आहेत. दगडासारख्या कठीण वस्तूपासून जाते, उखळ, पाटा वरवंटा खलबत्ता आदी वस्तू घडवून मानवाचे जीवन सजीव करून आपला चरितार्थ कसाबसा चालवणार्‍या समाजाला शेवटची घरघर लागली आहे.

स्वयंपाक घरात मिक्सर आल्यामुळे घरातील उखळ, पाटा-वरवंटा, खलबत्ता या वस्तूंचा वापर कमी झाला आणि हळूहळू या सर्व वस्तू अडगळीत गेल्या, शिवाय अनेक वर्षे टिकणार्‍या असल्यामुळे एकदा विकत घेतल्या की फुटेपर्यंत पुन्हा नवीन घ्यायची गरजच पडत नाही, त्यामुळे आजही अनेकांच्या घरातील जाते, उखळ, पाटा वरवंटा खलबत्ता हा 30 ते 50 वर्ष किंवा अगदी त्या पूर्वीचा देखील असू शकेल.

वडार समाजामध्ये माती काम करणारे आणि दगड काम करणारे असे दोन प्रकार आहेत. बहुतांश लोक घरे, इमारती, रस्ते आदीच्या बांधकामात मजुरी करतात आणि दगडकाम करणारा वडार समाज हे दगडापासून जातं, खलबत्ता, पाटा - वरवंटा अशा वस्तू बनविण्याचे काम करतात. दगडी वस्तू बनविण्यासाठी लोणावळ्यातून हे दगड आणले जातात. कोणत्या दगडापासून कोणती वस्तू घडवता यईल याचा अंदाज घेऊन दगड निवडले जातात. नंतर त्या दगडांना आकारानुसार छोट्या मोठ्या वस्तू तयार केल्या जातात. यामध्ये पाटा - वरवंटा 400 ते 500 रुपये, खलबत्ता 200 ते 300 रुपये, जातं 1 हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत विकले जाते.

लग्नकार्य, शोभेच्या वस्तूंसाठी उपयोग

लग्नकार्य म्हटले की, आजही जात्यावर हळद दळली जाते. पण जात्याचा वापर कमी झाल्याने ऐनवेळी जातंं आणायचं कुठून? असा प्रश्न पडतो. काही अपवाद सोडला तर एखाद्याच्या घरात जातं जपून ठेवले जाते. पण लग्नसराईमध्ये जातं उपलब्ध होणे कठीण असते. अशावेळी नागरिक जात्याची खरेदी करतात. तसेच लग्नात रुखवतासाठी खलबत्ता, दगडाचे तुळशी वृंदावन, छोट्या आकारातील पाटा वरंवटा यांची खरेदी केली जाते.

पूर्वी आम्ही जात्यावर धान्य दळून भाकरी करायचो. आता पिठाच्या गिरण्या आल्या. मिक्सर आले आणि आमच्या व्यवसायाला घरघर लागली. आता केवळ लग्नसराईत या वस्तूंना मागणी असते. त्यामुळे थोडाफार व्यवसाय होतो, असे 75 वर्षांच्या मुक्ताबाई जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT