While planting rice in the field of Mahesh Kudle, a farmer from Karanjgaon in Maval taluka
मावळ तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी महेश कुडले यांच्या शेतावर भात लावणी सुरू असताना पुढारी
पिंपरी चिंचवड

मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाने खरिपाच्या लागवडी वेगाने सुरू झाल्या आहेत. तालुक्याच्या प्रत्येक गावात लागवडी सुरू झाल्याने भात लावणीसाठी लागणार्‍या मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी मजुरीचे दरही वाढले आहेत.

मावळ तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाने जोर धरला असून जोरदार मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकर्‍यांनी भात लावणी सुरू केली असून, मिळेल त्यांच्यासह तसेच घरच्या मजुरांसह भात लावणी शेतकरी करत असल्याचे करंजगावचे युवा शेतकरी महेश कुडले यांनी सांगितले.

मागणी वाढल्याने मजुरीच्या दरात वाढ

गेले काही दिवस मावळ तालुक्यात मान्सूनचा दमदार पाऊस पडत आहे. या पावसाने तालुक्यात भात लावणीस योग्य वातावरण तयार झाले आहे. प्रत्येक गावात लागवडी एकाच वेळी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मजूर मिळत नसल्याने घरच्या नातेवाईकांसह व मजुरांसह भात लागवडी कराव्या लागत आहेत. त्यातच मजुरीचे दरही खूपच वाढले आहेत.

सध्या भात लागवडीसाठी मजुरांना दररोज 400 ते 500 रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते. याशिवाय त्यांच्या घरापासून शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत त्यांना नेण्या - आणण्याचा खर्चही करावा लागतो. दुपारचे जेवण हे शेत शेतकर्‍याला द्यावे लागते. अखेर भात लागवड करून घेण्यासाठी या सर्व गोष्टी शेतकरी दादाला सहन कराव्या लागत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 50 ते 100 रुपयांनी मजुरी वाढली असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

पूर्वेत अद्याप खाचरे कोरडी

मावळच्या पूर्वपट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अद्यापपर्यंत या भागातल्या भात लागवडीने वेग घेतलेला नाही. अद्याप या ठिकाणी खाचरे कोरडीच असल्याने शेतकर्‍यांनी लागवडी सुरू केलेल्या नाहीत. मात्र या भागात खरीप सोयाबीन, भुईमूग, उडीद, चवळी, मूग, वाटाणा या कडधान्ये पिकाच्या पेरण्या सुरू असल्याचे कृषी खात्याचे सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले.

तालुका कृषी विभागाचे उद्दिष्ट

मावळ तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्रावर मावळ तालुक्यात भात लागवड करण्याचे उद्दिष्ट तालुका कृषी विभागाकडून ठेवण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT