लोणावळा : जलद गती प्रवासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शनिवार व रविवारी तसेच गर्दीच्यावेळी मुंबईकरांच्या सोयीसाठी पुणेकरांची कोंडी केली जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
शनिवार व रविवारी तसेच सलग सुट्यांच्या काळामध्ये मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे सकाळपासूनच या मार्गावर होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका खंडाळा बोगदाजवळ 1515 मिनिटांचे ब्लॉक घेत थांबवत पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पर्यटक वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या केल्या जातात. त्यामुळे मुंबईकरांना सुसाट जाण्यासाठी मार्ग भेटत असला तरी पुणेकरांची मात्र कोंडी होत आहे.
खंडाळा घाटातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून ही उपाययोजना राबवली जात आहे. त्याचा त्रास मात्र पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने जलद गती प्रवासासाठी नागरिक वेळेचे नियोजन करून निघतात. मात्र, खंडाळा घाट परिसरात आल्यानंतर येथील मार्गिका ठराविक वेळेनंतर पंधरा पंधरा मिनिटांचे ब्लॉक घेत बंद केली जाते. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना काही काळ या वाहतूककोंडीमध्ये अडकवून पडावे लागत आहे.
शनिवार व रविवारच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक आज सकाळीच खासगी वाहनांमधून निघाल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर खंडाळा घाट ते खालापूरदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पुण्याहून येणारी मार्गिका खंडाळा बोगदा येथे थांबवत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी सर्व मार्गिका खुल्या केल्या जात होत्या.