Mobile Use  File Photo
पिंपरी चिंचवड

Mobile Use | मोबाईलचा अतिवापर ठरतोय जीवघेणा

मुलांवर वेळीच ठेवा नियंत्रण : तज्ज्ञांचे मत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा मोबाईल ही सध्या चैनीची वस्तू न राहता गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढत चालला आहे. तथापि, त्याचा अतिवापर हा जीवघेणा ठरत असल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे.

त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यासाठी वेळमर्यादा, निश्चित करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. मोबाईलचे लागले व्यसन सध्या काही लहान मुले आणि तरुणांना मोबाईलचे अक्षरशः व्यसन लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

लहान मुलांकडून पालकांनी अचानक मोबाईल काढून घेतल्यास ते आदळआपट, चिडचिड करतात. मोबाईलचे हे व्यसन तर काहींच्या जीवावर बेतत असल्याचे पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या काही घटनांवरुन समोर आले आहे.

शहरातील घटना :

  • मोबाईल व लॅपटॉपवर ऑनलाईन गेम खेळताना दिलेल्या टास्कमुळे १६ वर्षीय मुलाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन उडी मारल्याचा प्रकार किवळे येथे २६ जुलैला घडला.

  • वारंवार मागणी करूनही पतीने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काळेवाडीतील पवनानगर येथे ११ सप्टेंबरला घडली.

मोबाईलचे दुष्परिणाम

  • मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे आणि तरुणांचे मानसिक स्थैर्य हरवत चालले आहे.

  • एकाग्रता कमी होत असून चंचलता वाढली आहे. मन शांत राहत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

  • मुलांमध्ये चिडचिडेपणा, रागाच्या प्रमाणात वाढ

  • मुलांमध्ये जाणवतोय आत्मसंयम आणि जिज्ञासेचा अभाव

काय करायला हवे ?

  • मोबाईलचा वापर ठराविक काळ आणि ठराविक वेळेतच करण्याचा प्रयत्न करावा. मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायला हवे.

  • नातेसंबंधात पारदर्शकता असायला हवी.

  • मुलांच्या हातामध्ये मोबाईल देण्याऐवजी त्यांना विविध मैदानी खेळांमध्ये गुंतवायला हवे.

  • मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर ते मोबाईलवर काय काय पाहतात, याची तपासणी करायला हवी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT