पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
शहरी मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढविण्यासाठी मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमाच्या (स्वीपच्या) माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन जनजागृती करावी. (Assembly Election 2024)
तसेच मतदारांनी आपला संविधानिक हक बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी रविवारी (दि. २०) केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला अनुसरुन चिंचवड विधानसभा मतदासंघातील निवडणुक कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी थेरगाव येथील 'ग' क्षेत्रिय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी माहिती देताना अनिल पवार बोलत होते.
या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे, निवडणूक कार्यालयातील अधिकारी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्या दिवसापासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र (अर्ज) भरण्यास सुरुवात होईल. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.
त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असणार आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.
थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील बापूजी बुवा सभागृहात ही बैठक झाली. बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे, निवडणूक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, नीता गायकवाड, दीपक गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कुंभार आदी उपस्थित होते.
विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकायाँना निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी ग क्षेत्रीय कार्यालयातच त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवडणूक विभागाचे अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना अनिल पवार यांनी केल्या
चिंचवड विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासह विविध यंत्रणांनी समन्वय ठेऊन कामकाज करावे, अशा सूचना अनिल पवार यांनी पोलिसांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिल्या