Teacher Recruitment | खासगी शाळांना मिळणार आठ हजार शिक्षक Pudhari File Photo
पिंपरी चिंचवड

Pcmc News: मावळातील शिक्षण विभागात ‘प्रभारी’च झालेत ‘कारभारी’!

जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

गणेश विनोदे

वडगाव मावळ : मावळ पंचायत समिती शिक्षण विभागात गेल्या दोन-तीन वर्षांपासून गट शिक्षणाधिकार्‍यांपासून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक अशा सर्वच प्रमुख पदांवर ‘प्रभारी’ कार्यरत असल्याने मावळ तालुक्याचा शिक्षण विभाग प्रभारींच्या हाती, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षा निकालाच्या माध्यमातून दिसत असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेच्या अवस्थेला हा ‘प्रभारी’ कारभारच कारणीभूत ठरत असल्याचे मत जाणकार मंडळी करीत आहेत.

शिक्षण विभागाचे प्रमुख पद अडीच वर्षे प्रभारींच्या ताब्यात

मावळातील तब्बल 271 जिल्हा परिषद शाळांचा कारभार पाहणार्‍या पंचायत समिती शिक्षण विभागात गेल्या दोन-तीन वर्षांपासून बहुतांश पदांवर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाच्या असलेल्या गट शिक्षणाधिकारी या पदावर विस्तार अधिकारी असलेले सुदाम वाळुंज हे प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून 20 डिसेंबर 2022 पासून कार्यात कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचे प्रमुख पदच तब्बल अडीच वर्षे प्रभारींच्या ताब्यात आहे.

गट शिक्षणाधिकार्‍यांच्या खालोखाल असलेले विस्तार अधिकारी पदाच्या मंजूर असलेल्या पाच पदांपैकी नानाभाऊ शेळकंदे व संदीप काळे हे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तिसरे विस्तार अधिकारी राजकुमार बामणे हे भोर तालुक्यात प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून कारभार पाहत आहेत. तर, चौथे विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज हे मावळचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आहेत. पाचवे विस्तार अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे प्रभारी पदाची सूत्र असल्याने रिक्त असलेल्या दोन व प्रत्यक्षात रिक्त असलेल्या एक अशा तीन विस्तार अधिकार्‍यांच्या जागेवर सध्या केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले निर्मला काळे, भगवंत बनकर व सुनंदा दहीतुले हे अनुक्रमे वडगाव, तळेगाव दाभाडे व खडकाळा या बीटचे प्रभारी विस्तार अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

भौतिक सुविधा मिळतात; मग गुणवत्तेत वाढ का नाही ?

तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुनील शेळके हे शाळांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांचे गणवेश आदी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्पर असतात. काही सामाजिक संस्था, विविध कंपन्या, ग्रामपंचायत याही शक्य तितकी मदत जिल्हा परिषद शाळांच्या सुधारणासाठी करत असतात. याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. सर्व सोयी-सुविधा मिळत असताना शैक्षणिक गुणवत्तेत वाढ का होत नाही ? हा प्रश्नच आहे.

ग्रामीण भागातील भावी पिढी असक्षम होण्याची शक्यता

एकीकडे मावळ तालुक्यात सुरू असलेला सर्वांगीण विकास, विविध प्रकल्प तसेच पर्यटन वाढीमुळे निर्माण होत असलेली मावळ तालुक्याची ओळख आणि दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या पाया रचणार्‍या जिल्हा परिषद शाळांमधील ढासळत चाललेली शैक्षणिक गुणवत्ता यामुळे एकीकडे तालुका सक्षम होत असला तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील भावी पिढी मात्र असक्षम होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

24 पैकी 18 केंद्रप्रमुख प्रभारी

विस्तार अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी मंजूर असलेल्या 24 पैकी 6 केंद्रप्रमुख सद्यस्थितीत कार्यरत आहेत, त्यापैकी 3 केंद्रप्रमुख प्रभारी विस्तार अधिकारी हे पदभार सांभाळत आहेत. तर, उर्वरित 18 केंद्रप्रमुख हे प्रभारी आहेत. यामध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक किंवा शिक्षक म्हणून काम करणार्‍या काही जणांना प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे 24 पैकी तब्बल 18 केंद्रप्रमुख हे प्रभारी आहेत.

शिक्षकांच्या 64 जागा रिक्त

शाळेचे प्रमुख म्हणून कारभार पाहणार्‍या मुख्याध्यापक पदाच्या मंजूर असलेल्या 29 पदांपैकी फक्त 11 पदावर मुख्याध्यापक आहेत. तर, उर्वरित 18 मुख्याध्यापक हे प्रभारी आहेत. यामध्ये पदवीधर किंवा शिक्षक म्हणून कार्यरत असणार्‍यांना संधी देण्यात आलेली आहे. याशिवाय पदवीधर शिक्षकांच्या मंजूर असलेल्या 181 पदांपैकी 22 जागा रिक्त आहेत. तर, शिक्षकांच्या मंजूर असलेल्या 718 पैकी 64 जागा रिक्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT