पक्षातील मोठमोठी पदे उपभोगल्यानंतर पुढे आपला कार्यकर्ता, इतर पदाधिकारीदेखील मोठे झाले पाहिजेत, अशी भावना गतकाळातील राजकीय नेत्यांची होती. कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांसाठी अनेक दिग्गज निवडणुकीतून माघार घेत होते; परंतु सद्यस्थितीत शहरातील काही वरिष्ठ स्वत: संविधानिक पद भोगत असूनही त्यांना पुत्रप्रेमाचे भरते आले आहे.
महापालिका निवडणुकीत आपल्याकडे मोठी पदे असूनही काहीजण आपल्या पुत्राच्या राजकीय करिअरसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे हेलपाटे मारत आहेत; मात्र या चेहऱ्यांना जनसामान्यांचा विरोध असूनही या मंडळींचे पुत्रप्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरात एक, दोन नव्हे तर चार दिग्गजांनी आपल्या घरातील नावे पुढे केली आहेत. त्यामुळे घराणेशाहीचा हा नवा अध्याय मतदाराजाला निमूटपणे बघावा लागत आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात तीन वरिष्ठांकडून आपल्या घरातीलच नाव पुढे केले आहे. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांनी केवळ संतरंज्या उचलायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेत्याकडून आश्वासन पूर्ण न झाल्याने आधीच नाराज असलेल्या जनेतला त्याच घरातून येणारा उमेदवार नकोसा झाला आहे; मात्र याबाबतीत मतदारांना ग्राह्य धरले जात असून, तोच चेहरा लादला जात आहे. विशेष म्हणजे या नावासाठी कधी अंतर्गत तर, कधी बाहेरून विरोध होत आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून अनेकांनी या वेळेची वाट पाहिली होती. प्रभागात, नागरिकांमध्ये त्यांनी कामे केल्याचे ते सांगतात. मात्र, ‘आयत्या पिठावर रेघोटया’ या म्हणीप्रमाणे हे घडत आहे. तसेच त्यांच्या घरातील इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.
त्यामुळे त्या-त्या प्रभागातील जनसामान्य तसेच कार्यकर्ते दुखावले आहे. हे वजनदार नेते असल्याने सहाजिक पक्षातील वरिष्ठ नेते देखील त्यांचचे ऐकणार अशी कार्यकर्त्यांची समज होणे सहाजिकच आहे, कारण दोन,तीन दिवसांपूर्वी आम्हांला आमच्या प्रभागातीलच व्यक्ती नगरसेवकपदी हवा, अशी मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अपमानित करण्यात आले; ही घटना पक्षातील अनेकांना रुचली नाही. त्यामुळे आता पक्षातील कार्यकर्त्यांची हाक की, पुत्रप्रेम या दोघांमध्ये कोण, यामुळे संबंधितदेखील संभ्रमात आहेत. त्यामुळे पडद्यामागे होणाऱ्या घडामोडीतून नेमके काय घडेल, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनसामान्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.