कामशेत: दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे कामशेतची बाजारपेठ आकाश कंदील, पणत्या, विद्युत रोषणाईच्या माळा आदींनी सजली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
100 रुपयांपासून आकाश कंदील
सध्या कामशेतच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसत आहे. शहरातील बाजारपेठ ही मावळातील अग्रगण्य बाजारपेठ असून येथे दिवाळीमध्ये लाखोंची उलाढाल होत असते. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विविधरंगी पणत्या आणि आकाश कंदील विक्रीसाठी आले आहेत. विविध आकार आणि रंगांचे दिवे 50 ते 60 रुपयांपासून मिळत आहेत. दिवाळी ही आकाश कंदीलविना अपूर्ण आहे. प्रत्येकाच्या घरावर आकाश कंदील असतोच. बाजारपेठेत 100 ते 400 रुपयांपर्यंत आकाश कंदील मिळत आहे. तसेच, सुशोभित माळादेखील अगदी कमी किमतीत विक्रीकरिता आहेत.
रेडिमेड किल्ल्यांना मागणी
बालचमूंसाठी दीपावली सण एक पर्वणी असते. बाजारपेठेत रेडिमेड किल्ले विक्रीसाठी आले आहेत. तसेच, किल्ल््यावर ठेवण्यासाठी मावळेही विक्रीसाठी आहेत. 150 ते 200 रुपयांमध्ये मावळे मिळत आहेत. लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या सुबक मूर्तीही 50 रुपयांपासून विक्रीस उपलब्ध आहेत. दीपावलीमध्ये अंगणात सडा घालून रांगोळी काढण्याची परंपरा आहे. आज घरासमोरच्या अंगणाची जागा फ्लॅटसारख्या परंपरेने घेतली आहे. आता सडा घालता येत नसला तरी अनेक महिला फ्लॅट समोर रांगोळी काढतात. बाजारपेठेत रांगोळी 50 रुपये किलो या प्रमाणे उपलब्ध आहे. कामशेत बाजारपेठेत दिवाळीकरिता फटाक्यांचे स्टॉल लागलेले दिसत आहेत. या वर्षी चांगला पाऊस झाला असून, भातपीक ही जोमात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग खरेदीसाठी बाहेर पडलेला दिसत आहे.