Shardiya Navratri  File Photo
पिंपरी चिंचवड

Shardiya Navratri 2024 | लक्षवेधी दांडियांची दुकानात रास

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : नवरात्रोत्सव आजपासून सुरू होत आहे. नवरात्र म्हटले की, लहानांपासून ते मोठ्यापर्यंत दांडियाचा खेळ जिव्हाळ्याचा. बाजारपेठांमध्ये सध्या दांडियाचे विविध प्रकार पाहायला मिळत आहेत.

नवरात्रीमध्ये यंदा मेटलच्या मीनावर्क असलेल्या खास दांडिया, बांधणीचे कापड असलेल्या, मणी, झालरने सजलेल्या दोन तीन रंगांच्या, वेगळ्या प्रकारच्या दांडिया बाजारात आहेत. त्यात यंदा मीनावर्कचे सुरेख डिझाईन आणि लायटिंगच्या दांडिया अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रंगारंग संकेडा दांडिया

संकेडा हा दांडियाचा प्रकार आहे, त्यात विविधरंगी लेस लावून दांडियांना सुशोभित केले जाते. तीन आणि दोन रंगाच्या दांडियांचे रंग आकर्षित करणारे आहेत. त्यात अॅल्युमिनिअमच्या डिझाईनवाल्या, बेअरिंगच्या फिरणार्या दांडिया, मेटलच्या घुंगरू लावलेल्या दांडिया त्यांचा वेगळेपणा आणि टिकाऊपणा दाखवतात.

तिरंगा म्हणजे तीन रंगात असलेल्या लाकडी दांडिया. साध्या लाकडाच्यादेखील विविधरंगी आणि प्लेनदेखील दांडिया पाहायला मिळतील. लहान मोठ्या लेस लावलेल्या आणि कलरफुल अशा दांडिया दिसायला आकर्षित दिसतात.

मीनावर्क आकर्षक दांडिया

मेटलच्या डिझायनर दांडियांवर मीनावर्कची सुरेख डिझाईन केलेली असल्याने त्यांचे वेगळेपण उठून दिसते.

या दांडियांवर लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या या आकर्षक रंगांची डिझाईन साकारलेली आहे. दिसायला सुंदर आणि टिकाऊ असल्याने त्यांना अधिक पसंती दिली जाते, असे एका विक्रेत्याने सांगितले.

लाकडी दांडियांना पसंती

लाकडी दांडियांना पसंती असून त्या ५० पासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये राजाराणी या नावाच्या दांडिया १५० ते २०० रुपयांपर्यंत आहे.

बांधणी व कापड लावलेल्या, मेटलच्या दांडिया मोती दांडिया ५० ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी बेबी दांडिया, कुंदन दांडिया, लेसच्या दांडिया आदी विविध पहावयास मिळत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT