पिंपरी: महाराष्ट्रात गौरी-गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसर्या दिवशी गौरी येतात. एकट्या महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार गौरी पूजनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत.
कोकण, खान्देश, मराठवाडा, विदर्भ या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायाला मिळते. काहींकडे खापराचे - पितळेचे मुखवटे तर काहींकडे धातूंचे तसेच मातीच्या उभ्या पाटावर मांडलेल्या गौरी असतात. पण, या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरवाशीण गौराईंचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. (Latest Pimpri News)
काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख आहे. त्यामुळे सर्व राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिक याठिकाणचे रहिवासी आहेत, असे असले तरी सणासमारंभाची गावकडची परंपरा घरात आजही जपली जाते.
कोल्हापूर येथील गौरी
कोल्हापूर याठिकाणी तेरड्याची गौरी पुजली जाते. सकाळी कुमारिका मुली किंवा माहेरवाशीण गौरी आणण्यासाठी नदीवर चाफ्याची पाच पाने कलशात घेवून जातात. नदीवरून कलशामध्ये तेरड्याचे रोप टाकून आणतात. कलशामध्ये ठेवलेल्या या तेरड्याची तीन दिवस पूजा केली जाते.
कोकणातील गौरी
कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे. नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुले आणली जातात. त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात. तिला साडी, दागिने मुखवटा घालतात. काही भागात मूर्तींची पूजा होते. अनेक भागात लाकडी गौरी असतात. मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवीप्रमाणे नटवतात.
कराड-सातारामध्ये गंगा गौर
कराड सातारा भागात आणि तुळजापूर सोलापूर भागापासून पुढे पिढ्यान्पिढ्या सांभाळलेले मुखवटे असतात. यामध्ये लक्ष्मी आणि तिची थोरली बहीण अलक्ष्मी आणि त्यांची बाळे बसविली जातात.
कोळी समाजातील गौरी
कोळी समाजात गौरींचा सण साजरा करण्याची प्रथा थोडी वेगळा आहे. तिथे भाद्रपद सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी महिला तेरड्याच्या झाडाची फांदी गौरीच्या रुपाने घरी आणतात आणि ‘गौरी इलो’ म्हणत तिचं स्वागत करतात. कोळी बांधव देवीला मच्छीचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. रात्रीच्या जागरणासाठी महिला कोळी परंपरे प्रमाणे साड्या नेसून पारंपरिक नृत्य करतात.
खान्देश, मराठवाडा
खान्देश, मराठवाडा, विदर्भात महालक्ष्मीच्या रुपात गौरीची पुजा करतात. परंपरेनुसार धातू, मातीची मूर्ती किंवा कागदावर देवीची चित्र प्रतिमा पूजन करतात. विदर्भ- मराठवाड्यात हा सण सासुरवाशीणींचा सण मानला जातो. काही ठिकाणी गौरीच्या उत्सवाची वेगळी प्रथा पहायला मिळते. लहान आकाराची 5 मातीची बोळकी आणून त्यावर हळदीने रंगवलेला दोरा, खोबर्याच्या वाट्या आणि खारका घालतात. त्याची उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवण्यात येतो. गौरीच्या दोन प्रतिमा तयार केल्या जातात. काही ठिकाणी कुमारीका फुलं आणून पूजा करतात.
पूजनाला वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळा थाट असतो. फळं, करंज्या, लाडू, पुर्या, सांजोर्या, बर्फी दाखवतात. दुपारी पुरणपोळी, खीर, पुरी, घावन, घाटल्या, आंबिलाचा नैवेद्य दाखवतात. प्रत्येक भागानुसार तिथली प्रथा परंपरा जपली जाते.
विदर्भाची परंपरा
विदर्भात हाच सण महालक्ष्मी सण म्हणून साजरा करतात त्यात महालक्ष्मीच्या मुखवट्यांना तुळशी वृंदावनापासून अगदी वाजत गाजत घरामध्ये आणले जाते. घरातील एका सुवासिनी प्रमाणेच नटवून, सजवून त्यांच्या मुखवट्यांना स्थापन केले जाते. तीन दिवस त्यांचे पूजन केले जाते. पुरणपोळी, विविध प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवून माहेरवाशीणीचे लाड पुरवले जातात.