पिंपरी: माण, हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3 या मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू आहे. प्रत्यक्षामध्ये डिसेंबरमध्ये मेट्रो पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री तथा पीएमआरडीए अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. मात्र, अद्याप दहा टक्के काम अपूर्ण असून, काही स्थानकांचेही काम अपूर्ण असल्याचे चित्र आहे.
पुणे मेट्रो लाईन 3 हा महत्त्वाचा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून उभारला जात आहे. टाटा कंपनी आणि सिमेंस समूहाच्या नेतृत्वाखाली पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी ) मॉडेल अंतर्गत विकसित करण्याचे काम सुरू आहे. (Latest Pimpri News)
पुण्यातील विद्यापीठ येथील दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पामुळे आधीच या मेट्रो प्रकल्पाला उशीर झाला होता. तर दुसरीकडे हिंजवडीतील नागरी समस्या, वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर मेट्रो सुविधा लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘सिंगल पॉइंट ऑथॉरिटी’ तयार करून डिसेंबर पर्यंत मेट्रो सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तरी देखील मेट्रोच्या कामांमध्ये सुधारणा झाली नव्हती.
दरम्यान, या कामाला 25 नोव्हेंबर 2021 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. तर, कामाची मुदत वाढवून ती आता मार्च 2026 पर्यंत करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
तर, स्थानकाचे काम देखील सुरू असून, काही स्थानके अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, एकही स्थानक पूर्ण झाले नसल्याची माहिती पीएमआरडीए अधिकार्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे आता उरलेल्या तीन महिन्यांमध्ये दहा टक्के काम पूर्ण करणे हे पीएमआरडीएसमोर आव्हान आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
10 किलोमीटर पर्यंत चाचणी
माण डेपा पासून अवघ्या काही किलोमीटर पर्यंत मेट्रोची चाचणी यापूर्वी घेण्यात आली. मात्र काही दिवसांपूर्वी प्रथमच हिंजवडीच्या बाहेर म्हणजेच बालेवाडी पर्यंत मेट्रोची चौथी चाचणी घेण्यात आली. हे जवळपास 12 किलोमीटर होते. सर्वात पहिली चाचणी जुलैमध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर हिंजवडीच्या बाहेर म्हणजेच जवळपास दहा स्टेशन मेट्रो धावली.
जिन्याचे काम सुरू
मेट्रोचे बांधकामाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, तर स्थानकातील जिन्याचे काम सुरू आहे. काही स्थानकाचे 90 तर, काही स्थानकांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. आणखीन काही चाचणी बाकी असल्याने त्या पूर्ण झाल्यानंतरच मेट्रो सर्व स्टेशनवर धावू शकेल.
डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन त्या अनुषंगाने चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.रीनाज पठाण, मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.