वर्षा कांबळे
पिंपरी: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांच्या वारसांनी आणि निकटवर्तीय भक्तांनी पालखी सोहळ्याची अखंड परंपरा टिकून राहावी, यासाठी विविध जबाबदाऱ्या अनेक मानकरी घराण्यांकडे सोपवल्या, अशी परंपरा वारकरी संप्रदायात सांगितली जाते. या जबाबदाऱ्या केवळ सन्मानाच्या नव्हत्या; त्या सेवा, शिस्त, समर्पण आणि नि:स्वार्थ भक्तीच्या होत्या.
अशाच मानाच्या परंपरांपैकी एक म्हणजे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सोळंके घराण्याची सेवा. घराण्यातील पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या परंपरेनुसार, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानकरी म्हणून सेवा करण्याचा बहुमान या घराण्याला लाभला. आजही दरवर्षी गंगामसला येथून शेकडो वारकरी देहू येथे जाऊन पालखीसोबत पायी वारी सोहळ्यात सहभागी होतात. याबाबत कृष्णा सोळंके यांच्याकडून दैनिक पुढारीने घेतलेला आढावा.....
पालखी सोहळ्यामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिरातून उचलून पालखीत ठेवण्याचा मान हा सोळंके कुटुंबाला आहे. पण आम्हांला मसलेकर नावाने ओळखतात. आमचे मूळ आडनाव सोळंके आहे. वारीची प्रथा पुरातन काळापासून सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून संतांच्या पालख्या राज्यातून निघतात.
निजामांच्या काळात वारीवर लुटमारी व्हायची. काही मुस्लिम सैन्य वारीवर हल्ला करायचे. त्यामुळे काही वर्षांसाठी ही वारी खंडीत झाली होती. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर त्यांनी यामध्ये वैयक्तीक लक्ष घातले. छत्रपती संभाजी महाराजांच्या निगराणी खाली ही वारीची प्रथा पुन्हा सुरु झाली.
देहू हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे गाव आहे. त्यांचे आडनाव मोरे होते. आजही देहुगावात सर्व मोरे कुटुंबिय आहेत. त्याकाळी तारामती मोरे या देहुगावच्या सरपंच तसेच गावप्रमुख होत्या. त्यावेळी त्यांच्या पूर्वजांनी प्रत्येक कुटंबाला वारीची एक एक जबाबदारी दिली. त्यामध्ये सोळंकी परिवाराला पादुका उचलण्याच्या सेवेचा मान मिळाला. त्याबरोबर देहूतून पालखीचे प्रस्थान ते पंढरपूर येथे वारी पोहचते त्यांनतर काला होतो आणि वारीचा परतीचा प्रवास सुरु होतो. तेथपर्यंत सर्व जबाबदारी ही सोळंके कुटुंबियांना दिली जाते. असा जो ४० दिवसांचा प्रवास असतो त्यामध्ये प्रवासात देखील जिथे जिथे वारी पुढे जाते तसे पालखीचा रथाला ओढणारी जी बैलजोडी आहे तिचा मान देखील त्या ठराविक कुटुंबियांना असतो.
आमची जबाबदारी ही पादुका उचलणे तसेच वारीमध्ये जे काही देणगी येते. त्यांचा प्रत्येक दिवसाचा हिशेब ठेवला जातो. काहीजण सोने अर्पण करतात. अशा काही भेटवस्तू रथावर येतात. त्याचाही हिशेब दररोज केला जातो. ते बँकेत जमा केले जाते, असे कृष्णा सोळंकी यांनी सांगितले.
ते सांगतात की, पालखीतील वारकऱ्यांची सेवा, दिंडीचे नियोजन, शिस्त राखणे, आवश्यक व्यवस्था करणे आणि सेवाभावाने प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेणे ही जबाबदारी सोळंके घराण्याने अनेक पिढ्यांपासून अत्यंत निष्ठेने पार पाडली आहे. त्यांच्या दृष्टीने हा मान प्रतिष्ठेचा नसून संतसेवेचा आणि विठ्ठलभक्तीचा आहे.
गंगामसला येथील सोळंके घराण्याची ही परंपरा केवळ एका कुटुंबाचा इतिहास नाही; ती वारकरी संप्रदायातील सेवाभाव, समर्पण आणि संस्कारांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. कारण वारीमध्ये मान हा पदाचा नसतो, तो सेवाभावाचा असतो. आणि हीच सेवा, हीच निष्ठा, हीच भक्ती वारीला आजही जिवंत ठेवते. आजही लाखो वारकरी एकाच विश्वासाने चालतात. आपल्याला विठ्ठल भेटेल की नाही, याची चिंता नसते; पण विठ्ठलाच्या नामात चालत राहणे, हाच त्यांच्या जीवनाचा खरा आनंद असतो.