Crops Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Heavy Rain Kharif Crops: देहू परिसरात दमदार पाऊस; खरीप पिकांना मोठा दिलासा

सोयाबीनला शेंगा भरण्यासाठी पोषक वातावरण; भातावर खोडकीड, सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा धोका

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: देहू परिसरात मागील दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देहू, माळीनगर, विठ्ठलनगर, किन्हई आदी भागांत भात, सोयाबीन तसेच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या कालावधीत पिकाला पाण्याची आवश्यकता असते. शेंगा भरण्याच्या काळात पुरेसा पाऊस झाल्यास दाणे चांगले भरून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे रविवारी झालेला पाऊस सोयाबीन पिकासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जुलैमध्ये झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या व लागवडीची कामे उरकली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर बनली होती. मका, भुईमूग आणि तूर ही प्रमुख पिके पाण्याविना वाळून जात आहेत. बियाणे, खतांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होती. तसेच, पावसाच्या मोठ्या खंडामुळे भूजल पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले होते. अशातच मागील दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.

भात पिकावर ‘खोडकीड’चा प्रादुर्भाव

दरम्यान, सध्या परिसरात ऊन-पाऊस व ढगाळ हवामानाचा अनुभव येत असल्याने भात व सोयाबीन पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. भात पिकावर खोडकीड, तर सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करून आवश्यकतेनुसार वेळेत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन सहायक कृषी अधिकारी जयश्री पाडेकर यांनी केले आहे. दरम्यान, देहूगाव, देहूरोड परिसरातील शेतकऱ्यांनी झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास इमॅमेक्टिन बेन्झोएट ७ ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
जयश्री पाडेकर, कृषी अधिकारी, देहूगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT