पिंपरी: ढोलीडा, गरबे की रात, उडी उडी जाये, चो गाडा तारा, पेथल पूरमा अशा हिंदी चित्रपटातील तर काही पारंपरिक गरबा आणि दांडियाच्या गाण्यांवर शहरातील विविध भागांमध्ये दांडिया खेळण्याचा उत्साह दुणावला आहे. पारंपरिक गुजराती गीतांवर गरबाचे कार्यक्रम रंगत असून, त्यात नॉनस्टॉप बॉलिवूड गाण्यांचा तडका असे समीकरण पाहायला मिळत आहे.
पारंपरिक वेशभूषेत दांडिया गीतांवर थिरकरणारे तरुण-तरुणी, गरबा करणारे पुरुष अन् वैविध्यपूर्ण वेशभूषेत मैत्रिणींबरोबर दांडियात सहभागी झालेल्या महिला अशा आनंदी वातावरणात ठिकठिकाणी आयोजिलेल्या दांडिया-गरबाच्या कार्यक्रमाचा आनंद शहरवासीय लुटताना दिसत आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक दांडिया-गरबा गीतांवर तरुणाई अन् अबालवृद्धांचा कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, वाल्हेकरवाडी,संत तुकारामनगर आदी ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्यात आले असून, खासकरून तरुणाई मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या दिमाखात विविध इव्हेंट कंपन्या अन् संस्थांना सहभागी करून दांडिया-गरबाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमांमध्ये तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसत आहे. प्रत्येकाने दांडिया-गरबाच्या वेशभूषेत ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांत सहभाग नोंदवला.
आर्केस्ट्रातील कलाकारांनी गायिलेले पारंपरिक दांडिया-गरबाची गीते, तर कुठे बॉलिवूड रीमिक्स गीतांवर तरुणाईने दांडिया उत्सवाची रंगत वाढवित आहेत.
शहरातील मैदाने आणि लॉन्समध्ये दररोज दांडियाच्या गाण्यावर धूम पहायला मिळत आहे. सायंकाळी सात वाजल्यानंतर कार्यक्रम रंगत आहेत. अगदी शहरातील छोट्या मोठ्या वस्त्यावर आणि सोसायट्यांमध्येदेखील दांडियांचे आयोजन केले आहे. त्यामुळे नवरात्रीच्या रंगामध्ये शहर न्हाऊन निघाले आहे. शहरात आयोजित दांडियामध्ये मनसोक्त गरबा खेळताना तरुणी. (छाया : यशवंत नामदे.