पिंपरी : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत परराज्यात जाऊन तब्बल 102 सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडाकेबाज सर्जिकल स्ट्राईक कारवाईमुळे पोलिस दलाचे विशेष कौतुक होत आहे. देशाच्या विविध भागांतून, तसेच रशियातूनही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची कामगिरी सायबर पोलिसांनी बजावली आहे.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात फसवत आहेत. बनावट शेअर मार्केट गुंतवणूक, बँकिंग फसवणूक, हॅकिंग, फिशिंग आणि सोशल मीडिया फसवणुकीसारख्या गुन्ह्यांवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याआधी निष्क्रिय वाटणार्या सायबर पोलिसांनी आता धडाकेबाज कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
गुजरात, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन सायबर पोलिसांनी आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे जयपूर येथे सायबर गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या अंगावर आरोपींनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत आणि जिवावर उदार होऊन स्वामी यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. या धाडसी कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे.
सायबर पोलिसांच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. सायबर पोलिसांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तसेच, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, तसेच पोलिस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, सुभाष पाटील, विशाल निचीत, दीपक माने, खणसे, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, सौरभ घाटे आणि महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले.
सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वेगाने वाढत असताना, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी देशभरात आपली छाप उमटवली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वेळेचे भान आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर या पथकाने गेल्या वर्षभरात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे राज्यभरात पोलिस दलाची प्रतिष्ठा उंचावली आहे.