पिंपरी: राज्य सरकारने नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांची कामे मुदतीत पूर्ण करणे, जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करणे, तक्रार निवारण आणि परस्पर संवाद वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
प्रशासनाने हा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक आयुक्त सिंह यांनी काढले आहे. यामध्ये नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करावे. अधिकार्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून द्यावी. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. शहरात उद्योग सुरू करू इच्छिणार्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी. केंद्र व राज्यस्तरीय योजनांची अंमलबजावणी करावी.
महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करण्यात यावे. सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली जी माहिती नागरिक माहिती अधिकाराचा वापर करून विचारतात. ती माहिती विभागांनी पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन कराव्यात. यासह सायबर सुरक्षेबाबत नागरिकांना हमी द्यावी. सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षमीकरण करावी. पीएमपीएल बस, रेल्वे, मेट्रो सेवांची वारंवारिता व नेटवर्क सुधारावे. यासह तक्रार निवारण दिन, लोकशाही दिन, अधिकारी व नागिरक यांच्या संवाद, एक खिडकी उपक्रम राबवावा.
महापालिका कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण दिन घेण्यात यावा. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी, रद्दी काढून टाकाव्यात. शहरात सौंदर्यीकरण करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांची तपासणी करा
शंभर दिवसांत महापालिकेकडून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांची तपासणी करून पुरविल्या जाणार्या शिक्षण व आरोग्यविषयक सुविधांची पाहणी करावी. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, शिक्षणाची गुणवत्ता, शालेय सुविधा तपासावी. तर, आरोग्य केंद्रात डॉक्टरची उपलब्धता, औषधांची गरज, अंगणवाडीतील बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्याचा आढावा घेतला जावा, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.