खराळवाडी: खराळवाडी परिसरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत व खराळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, खोकला आदींचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खराळवाडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी गर्दी केली आहे.
सध्या खराळवाडी परिसरात सर्दी, खोकला, थंडीताप, अतिसार, मलेरिया, अंगदुखी, चिकुनगुनिया या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खराळवाडी उपकेंद्रात सध्या रुग्णांची संख्या वाढली आहे. (Latest Pimpri News)
तसेच, आता पावसाळ्यात थंडीताप, खोकला यांसारख्या आजाराने अनेक नागरिक आरोग्य उपकेंद्रांवर तपासणीला जात आहेत. खराळवाडी आरोग्य उपकेंद्रावर तपासणीसाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. बसायला जागा शिल्लक नव्हती, काही रुग्ण जागा शिल्लक नसल्याने उभे राहिलेले दिसत होते.
एक महिन्यापासून पिंपरी शहर, उपनगरातील खराळवाडी, नेहरूनगर, संत तुकारामनगर, मोरवाडी, अजमेरा, यशवंतनगर, मासुळकर कॉलनी, वास्तू उद्योग, पिंपरीगाव, डिलक्स चौक, भीमनगर, बौद्धनगर, रमाबाईनगर, वैशालीनगर या परिसरात पावसामुळे थंडीताप, खोकला, अंगीदुखी या आजारांनू नागरिक त्रस्त आहेत.
पिंपरी शहर, उपनगरांत पावसाळ्यात नागरिकांना थंडीताप, अतिसारासारखे आजार वाढले. त्याचप्रमाणे सध्या खराळवाडी परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिका आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी खराळवाडी आरोग्य उपकेंद्रावर तपासणीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे अनेक लोक सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जात आहेत.
आरोग्य विभागाकडून जनजागृतीची गरज
खराळवाडी परिसरात डेंग्यू, मलेरिया तसेच थंडीतापाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी महापालिकेने औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिका आरोग्य विभागाने पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्याची मागणी केली जात आहे. शहरात थंडीताप, खोकला, अंगीदुखी, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढल्याने महापालिका प्रशासनाने जनजागृती करण्याची मागणी होत आहे.
सध्या थंडीताप, सर्दी, खोकला या औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. रोज नियमितपणे ओपीडीत 60 ते 65 रुग्णांची तपासणी केली जाते. तरी नागरिकांनी ताप, खोकला हे आजार अंगावर न काढता जवळच्या महापालिका उपकेंद्रात तपासणीसाठी यावे.- डॉ. वर्षा कदम, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, महापालिका उपकेंद्र, खराळवाडी