Smart Parking System Pudhari
पिंपरी चिंचवड

Smart Parking System: कोंडीमुक्त करण्यासाठी नवीन पार्किंग पॉलिसी; स्थायी समितीचे अध्यक्षा अभिषेक बारणे यांची माहिती

बैठकीत शहरी दळणवळण विभागाकडून नवीन पार्किंग पॉलिसीचे सादरीकरण करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शहरात सक्षम पे ॲण्ड पार्क पार्किंग पॉलिसी राबवली जाणार आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या समन्वयाने हे नवे धोरण लवकरच शहरात अंमलात आणले जाणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिली.

महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीस सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, आयटीडीपीचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरी दळणवळण विभागाकडून नवीन पार्किंग पॉलिसीचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामध्ये धोरणाची तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू मांडण्यात आली. त्यावर सर्व बाजूंनी चर्चा झाल्यानंतर, धोरण अधिक लोकाभिमुख आणि त्रुटीरहित करण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करण्याच्या सूचना अभिषेक बारणे यांनी केल्या. त्या सूचनांचा समावेश करून हे नवीन पार्किंग धोरण लवकरच अंमलात आणले जाणार आहे.

नव्या पार्किंग धोरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व व्यावहारिक उपायांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक भागाच्या गरजेनुसार एरिया बेस्ड पार्किंग व्यवस्था विकसित केली जाईल.

नागरिकांच्या सोयीसाठी कलर कोडिंग सिस्टीम लागू केली जाणार आहे. रस्त्यालगत घर असणाऱ्या स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना विशेष पार्किंग परमिट दिले जाईल. शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी जड वाहनांची पार्किंग पूर्णपणे बंद करून त्यांच्यासाठी शहराबाहेर जागा निश्चित केली जाणार आहे.

अनावश्यक पार्किंग टाळण्यासाठी थेट सॅटेलाईटद्वारे जागांची पडताळणी करण्यात येणार आहे. या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र पार्किंग मॅनेजमेंट कक्ष स्थापन केला जाईल. या धोरणात वाहनचालकांसह पादचारी आणि सायकलस्वारांसाठीही स्वतंत्र व सुरक्षित जागा निश्चित करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडणार नाही

नवीन पार्किग पॉलिसी राबवताना केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढाच हेतू नसून, पादचारी आणि सायकल चालवणाऱ्यांनाही सुरक्षित रस्ते मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. ऑन स्ट्रीट आणि ऑफस्ट्रीट पार्किंगचे दर ठरवताना सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून, उत्तम पार्किंग पॉलिसी लवकरच नागरिकांच्या सेवेत आणले जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

जुनी पॉर्किंग पॉलिसी गुंडाळली

तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांच्या काळात शहरात पे ॲण्ड पार्क पार्किंग पॉलिसी सुरू करण्यात आली होती. मात्र, वाहनचालकांचा कमी प्रतिसाद, वाहतूक पोलिसांचा असहकार, ठेकेदारांचा नकारात्मक प्रतिसाद, प्रशासनाची धरसोड वृत्ती आदी कारणांमुळे ते धोरण गुंडाळण्यात आले होते. त्यावर महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला होता. आता नव्याने सक्षम पॉलिसी राबवण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT