दीपेश सुराणा
पिंपरी: पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयातंर्गत न येणार्या गावांतील नागरिकांना जमीन मोजणी तसेच प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी येरवडा येथील हवेली भूमी अभिलेख कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची पायपीट होत आहे. तसेच, एकाच भेटीत हे काम होत नसल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा देखील खर्च होत आहे.
पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयांतर्गत प्रॉपर्टी कार्ड, शेतजमिनींची मोजणी, जमिनींचे नकाशे, भूसंपादनाची मोजणी, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी, वारसा वाटणी नोंदणी, आकारफोड आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. महापालिका हद्दीतील काही गावे नगरभूमापन कार्यालयांतर्गत तर काही गावे येरवडा येथील हवेली भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत विभागलेली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना जवळच्या कार्यालयाऐवजी येरवडा येथे हेलपाटे मारावे लागत आहेत.
भूमी अभिलेख हवेली कार्यालय क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही गावे यापूर्वी येत होती. मागील काही वर्षांमध्ये काही गावे अभिलेखासहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न केलेली आहेत. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील उर्वरित गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. ही गावे पिंपरी चिंचवड नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगर भूमापन कार्यालयाचे क्षेत्र विस्तारणार महानगरपालिका हद्दीत हवेली तालुक्यातील एकूण 30 गावे आणि मुळशी तालुक्यातील 3 गावांचा समावेश नगर भूमापन अधिकारी कार्यालयातंर्गत करण्यात येणार आहे. त्यापैकी 12 गावांचे पूर्ण क्षेत्र आणि किवळे, रावेत, मोशी, चिखली, देहू, तळवडे या 6 गावांतील अंशत: क्षेत्र व मुळशी तालुक्यातील वाकड असे एकूण 7 गावांतील अंशत: क्षेत्राचा समावेश आहे. यापैकी 11 गावांचा पूर्णत: समावेश करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच राज्य शासनाकडून अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.https://www.youtube.com/watch?v=Yeeujhty88I
पिंपरी येथील नगर भूमापन कार्यालय अंतर्गत नव्याने 17 गावे समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. संबंधित गावे नगरभूमापन कार्यालयातंर्गत समाविष्ट केल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे त्यांना जमीन मोजणी किंवा प्रॉपर्टी कार्डच्या कामासाठी हवेली भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागणार नाही.अमित ननावरे, नगर भूमापन अधिकारी, नगर भूमापन कार्यालय, पिंपरी.