हिंजवडीनंतर चाकणच्या समस्यांनी काढले डोके वर Pudhari
पिंपरी चिंचवड

Civic Issues: हिंजवडीनंतर चाकणच्या समस्यांनी काढले डोके वर

आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचे यंत्रणेला उपाययोजनांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Chakan civic issues

पिंपरी: हिंजवडीतील समस्यांवर वेगवेगळ्या माध्यमांतून उपाययोजना सुरू असतानाच, चाकणमधील वाहतूक कोंडीची समस्या पुढे आली आहे. पीएमआरडीएने हिंजवडी प्रकरण हाताळल्यानंतर आता चाकणच्या परिस्थितवर लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यातच पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत हा मुद्दा समोर आला आहे.

रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे निर्देश औद्योगिक क्षेत्रासह इतर ठिकाणची अतिक्रमणे काढावीत. तसेच, रस्त्यावर उभे राहणार्‍या वाहनांवर कारवाईसाठी एमआयडीसी, पोलिस यंत्रणेला निर्देश देण्यात आले. नागरी सुविधांसाठी एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आदी विभागांनी चाकण हद्दीतील रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. यासह संबंधित यंत्रणांनी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश या वेळी पीएमआरडीए आयुक्तांनी दिले. (Latest Pimpri News)

औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच पर्यायी मार्गाचा विचार करुन तातडीने त्यासंबंधीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणांना देण्यात आले. बैठकीत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, आमदार बाबाजी काळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, महागनर नियोजन समिती सदस्य वसंत भिसे यांच्यासह औद्योगिक संघटना, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडी

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसह रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिकांसह व्यावसायिकांना अडचणी येत आहे. यासंदर्भात पडताळणी करून उपाययोजना करण्याचे निर्देश पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते खराब झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, रहदारीला अडचणी येत आहे. यासह वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी होत आहे. यावर पर्यायी मार्ग म्हणून संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते दुरुस्त करत या भागातील अतिक्रमणे तात्काळ काढून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

या भागातील समस्यांवर चर्चा

पुणे-नाशिक रस्ता, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, माई ते चिखली, निघोजे ते कुरळी, चाकण ते आळंदी अशा विविध परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सद्यस्थितीत या रस्त्यावर अवजड तसेच प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यांना पर्यायी रस्ते नसल्याने येथे नेहमी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. परिणामी, याबाबत स्थनिक नागरिकांनी उपाययोजनांची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT