बजरंग जाधव
आकुर्डी: आकुर्डी येथील विठ्ठलवाडी, दत्तवाडी तसेच गुरुद्वारा परिसरामध्ये काळ्या रंगाच्या केसाळ अळ्यांनी (सुरवंट) धुमाकूळ घातला आहे. घराच्या भिंती, संरक्षक भिंती, कौले, घराचे छत, छप्पर, झाडांच्या बुंध्यावर तयार झालेल्या अळ्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
या अळ्या नागरिकांच्या अंगावर चढल्यानंतर मोठ्या प्रमाणात हातापायांना खाज येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, लहान मुले, महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील परिसरात औषध फवारणी करून नागरिकांची यातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे. (Latest Pimpri News)
दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी, घरे व जुने गुंठेवारी करून बांधलेली घरे आहेत. यावर्षी मे महिन्यापासून सातत्याने शहरात पाऊस पडत असल्याने सातत्याने घरांच्या भिंती ओलसर राहत आहेत.
मागील वर्षीही याच कालावधीमध्ये या परिसरामध्ये काळ्या रंगाच्या केसाळ अळ्या मोठ्या प्रमाणावरती भिंती, झाड, छतावर निर्माण झाल्या आहेत. त्यावर मागील वर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी करण्यात आली होती; परंतु ही औषधे फवारणी या अळ्यावरती निष्प्रभ ठरली होती.
या अळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात मागील वर्षी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण या आळ्यांचा स्पर्श जरी झाला तरी अंगावरती खाज येणे, गांदी येणे, शरीराला सूज येणे या प्रकारची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आकुर्डी परिसरामध्ये या आळीविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी या परिसरात काळ्या रंगाच्या केसाळ आळ्यांची समस्या उद्भवली आहे. कशामुळे अळी निर्माण होतात, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न
आकुर्डी परिसरात मागील काही दिवसांपासून काळ्या रंगाच्या केसाळ अळ्यांचा प्रश्न उद्भवला आहे. या अळ्या लहान मुलांच्या, नागरिकांच्या अंगावर पडल्यास गांदी येणे, अंगाला सूज येणे, तसेच खाज येत असल्याने नागरिक लहान मुलांना घराबाहेर खेळण्यास पाठवताना भीत आहेत. यामुळे लहान मुलांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांचे प्रशासनाला प्रश्न
महानगरपालिका प्रशासनाकडून औषध फवारणी होणार का?
काळ्या रंगाच्या केसाळ अळ्यांवरती प्रतिबंधात्मक उपायायोजना काय करणार?
औषध फवारणी केल्यानंतर या अळ्यांचा नायनाट होईल का?
पावसाळी परिस्थितीमध्ये भिंतीमध्ये ओलावा निर्माण होऊन अशा प्रकारची जीवजंतू निर्माण होतात; परंतु ते ठरावीक काळानंतर आपोआप मरण पावतात. या अळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने सतर्कता बाळगावी. यावर महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येईल.- राजू साबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी.