जगन्नाथ काळे
Fire News: तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात शुक्रवारी(दि.१४) दुपारी १.३०वा.सुमारास ओसाड परिसरात वाळलेल्या झुडूपांना आणि झाडांना अचानक आग लागली होती. यावेळी परिसरात धुराचे उंच- उंच लोट दिसत होते यामुळे नागरिक वस्तीत आणि जवळील दुकानात घाबराट झाली होती.
या आगीच्या घटनेमुळे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीच्या ठिकाणी आग विझविण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आणि वडगाव(मावळ) नगरपंचायतीची अग्नीशमन वाहने आणि कर्मचारी तेथे तातडीने दाखल झाले.
अग्नीशमन कर्मचारी आकाश ओहोळ, धिरज शिंदे, शेखर खोमणे, निरंजन भेगडे, हनुमंत तुमकर, ताहीर मोमीन, विनोद ढोरे, समीर दंडेल आणि स्थानिक नागरिकांनी सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्नीशमन बंब तातडीने आले नसते तर सभोवतालच्या नागरीवस्ती मध्ये आणि दुकानात आग पसरण्याचा धोका होता. तळेगाव दाभाडे परिसरात असे वाळलेली झुडूपे मोठ्या प्रमाणात आहेत.
ती झूडपे वाळलेली असून सध्याच्या कडक उन्हामुळे आणखी वाळतील आणि आग लागण्याच्या घटना वारंवार घडण्याची शक्यता असून नागरी वस्तीत जिवीत आणि अर्थिकहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच तळेगाव स्टेशन भागात आनंदनगर परिसरातही वाळलेल्या झुडूपांना दुपारी ३ च्या सुमारास आग लागली होती अशा दोन घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडल्या आहेत. यामुळे प्रदुषणातही वाढ झाली आहे. तरी प्रशासनाने या घटनेची दखल घ्यावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
तळेगाव दाभाडे येथील बांधकाम चालु असलेल्या नवीन इमारतीस गेल्या आठवड्यात आग लागली होती.आता तळेगाव स्टेशन भागात मैदानातील वाळलेल्या झुडूपांना आग लागली अशा घटना गंभीर आहेत प्रशासनाने दखल घ्यावी.आशिष खांडगे,सामाजिक कार्यकर्ता तळेगाव दाभाडे.