क्राइम न्यूज  Pudhari
पिंपरी चिंचवड

डॉन नाही... आता ‘छपरी’! सोशल मीडियावरील गुंडांना ‘छपरी’ टॅग देऊन त्यांची नाचक्की

अनेकजण ट्रोलिंगला सामोरे जात असून

संतोष शिंदे

पिंपरी : अलीकडच्या काळात गुन्हेगारी टोळ्यांचे सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे वर्चस्व वाढू लागले आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर गुंड त्यांच्या टोळ्यांचा उदो-उदो करणार्‍या रिल्स तयार करून व्हायरल करत आहेत. गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणे, हातातील शस्त्रे दाखवत सार्वजनिक ठिकाणांवर दहशत निर्माण करणे, प्रतिस्पर्धी टोळ्यांना धमक्या देणे, यासारख्या प्रकारात वाढ झाल्याचे समोर आले आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने, या गुंडगिरीवर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आता एक अनोखी आणि प्रभावी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावरील गुंडांना ‘छपरी’ टॅग देऊन त्यांची नाचक्की करण्याचा सपाटा लावला आहे.

गुंडांचे स्टारडम संपून ‘छपरी’चा शिक्का !

गुन्हेगार सोशल मीडियावर स्वतःला ‘डॉन’ म्हणून दाखवत होते. मात्र, आता पोलिसांनी त्यांच्या ‘प्रतिष्ठे’वरच आघात केला आहे. गुन्हेगारी टोळीतील एका सदस्याला त्याच्या टोळीप्रमुखाला ‘छपरी’ म्हणायला लावत ती पोस्ट त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल केल्या आहेत. त्याचा थेट परिणाम गुन्हेगारांच्या फॉलोअर्सवर होत आहे. अनेकजण ट्रोलिंगला सामोरे जात असून, त्यांच्या ‘डॉनगिरी’ची हवा निघाल्याचे चित्र आहे.

समुपदेशनासोबत कायदेशीर कारवाई

ट्रोलिंग आणि समाजात नाचक्की करून पोलिस थांबलेले नाहीत. काही गुन्हेगारांना बोलावून त्यांना कायद्याचे गांभीर्य समजावले जात आहे. जर कोणी वारंवार असे गुन्हेगारी प्रदर्शन करत असेल, तर त्यांच्यावर खझउ कलम 505 (1) (इ), खझउ कलम 153- आणि खढ रलीं 67 अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, त्यामध्ये दंडासह कारावासाचीही तरतूद आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट निदर्शनास आल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करावी.

पोलिसांची डिजिटल रणनीती

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनोख्या मोहिमेमुळे गुन्हेगारी टोळ्यांना जोरदार धक्का बसला आहे. ‘डॉन’ बनण्याच्या नादात ‘छपरी’ ठरलेल्यांना हा मोठा धडा ठरणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी कंटेंटवर कठोर कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी यातून दिला आहे.

पोलिस कारवाईची पद्धत

सोशल मीडियावरील अशा गुन्हेगारी रिल्सवर पोलिस सतत नजर ठेवून आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक डिजिटल मॉनिटरिंग टीम तयार केली आहे, जी सतत गुन्हेगारी कंटेंट शोधून त्यावर कारवाई करते. गुन्हेगार ज्या अकाउंटवर स्वतःला ‘हीरो’ समजत होते, त्याच अकाउंटवर ‘छपरी’ ठरवलेल्या पोस्ट पडत आहेत. यामुळे गुन्हेगारांचे फॉलोअर्सला धक्का बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT