पिंपरी: चर्होली खून प्रकरणात पोलिसांनी एका धक्कादायक कटाचा उलगडा केला आहे. वहिनीशी असलेल्या अनैतिक संबंधातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी भावानेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात मृत भावाची पत्नीही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून, अनैतिक संबंधातून भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
धनू लकडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ लकडे याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, धनूची पत्नी शीतल हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राईल्स वर्ल्ड सिटी, पठारेमळा, चर्होली येथील सिक्युरिटी केबिनच्या समोर धनू लकडे यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या डोक्यावर हत्याराने वार करण्यात आले होते. सुरुवातीला अज्ञात आरोपीविरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Latest Pimpri News)
या खुनाची फिर्याद आरोपी भाऊ सोमनाथ यानेच दिली होती. अज्ञात व्यक्तीने धनू यांच्या डोक्यावर वार करून खून केल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते. मात्र, फिर्यादीच्या वर्तनावर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या इतर पथकांनी त्याच्याकडे चौकशीदेखील केली होती; मात्र आरोपीने पोलिसांच्या प्रश्नांना अतिशय शांतपणे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते.
तपासाच्या सुरुवातीपासून गुंडा विरोधी पथक स्वतंत्रपणे काम करत होते. त्यांना स्थानिक खबर्याकडून माहिती मिळाली की, आरोपी सोमनाथ याचे वहिनी हिच्याशी अनैतिक संबंध आहेत. मृत धनू यांना याबाबत संशय होता. त्यामुळे कुटुंबात तणाव वाढला होता. धनू यांनी आक्षेप घेतल्यामुळे तो त्याची पत्नी आणि भावासाठी अडथळा ठरू लागला होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा खून केला.
वहिनीशी तासन् तास गप्पा
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्सचा बारकाईने अभ्यास केला. पोलिस हवालदार एस. पी. बाबा आणि जी. डी. चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये आरोपी भाऊ हा वहिनीशी तासनतास गप्पा मारत असल्याचे समोर आले.
याबाबत पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला शांतपणे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आरोपी गोंधळला. काही वेळाने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, धनू भाऊ आमच्या नात्यातील अडथळा ठरत असल्याने आम्ही मिळून त्याचा खून केला. त्याचा कबुली जबाब ऐकून पोलिसही अवाक झाले.
वहिनी शीतलही कटात सहभागी
गुन्ह्यातील दुसरी आरोपी शीतल धनू लकडे हिनेही गुन्हा करण्यास मदत केल्याचे समोर आले आहे. गुंडा विरोधी पथकाने तिला ताब्यात घेतले असून, तिची सखोल चौकशी सुरू आहे. तिने गुन्हा घडण्याआधी आणि नंतर आरोपी सोमनाथला नेमकी काय व कशी मदत केली, याबाबत तपास सुरू आहे.