पिंपरी: ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून वेगवेगळया खेळी सुरु आहेत. त्यातच निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना पक्षाकडून उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही अथवा ती जाहीर केली जात नाही; परंतु पक्षातील स्थानिक वरिष्ठांकडून काही इच्छुकांना निरोप गेले असून, त्यांना कामाला लागा, असे सांगण्यात आल्याचे समजते; मात्र अंतिम यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये कमालीची धाकधूक वाढली आहे.
एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षाची युती झाल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर आरपीआय आठवले गट या पक्षाला देखील शहरातील काही जागा सोडण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत अहो. या जागावाटपाच्या गोंधळात पक्षातील इच्छुकांचे जीव टांगणीला लागले आहेत. जागांची वाटाघाटी, प्रभागातील सर्व्हेक्षण याचबरोबर कोणता प्रभाग सोडायचा याबाबतचे गुऱ्हाळ सुरु आहे. तर, दुसरीकडे पक्षातील आमदार तथा निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप यांनी रविवारी पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी घोषणा केली; मात्र यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी होऊ नये म्हणून यादी जाहीर करण्यास विलंब केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी सकाळपर्यंत यादी जाहीर होणे अपेक्षित असताना, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची घालमेल सुरु होती; तसेच इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर होता. इतर पक्षात अथवा अपक्षांची चाचपणी देखील सुरु झाली आहे. भाजपाकडून यादी जाहीर न झाल्याने त्याच्यातील नाराजींना आपल्याकडे घेण्यासाठी महाविकास आघाडी देखील ‘वेट ॲड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे दिसून येते. पक्षात जवळपास 128 जागांसाठी आठशे जण इच्छुक आहेत. त्यातच मित्रपक्षाला जागा सोडावी लागणार असल्याने नाराजींची संख्या वाढणार असून, पक्षातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. हे सर्वप्रकार घडू नयेत, यासाठी यादी जाहीर करण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.
इच्छुक प्रतीक्षेत
यादीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम सुरु आहे, असे सांगत पक्षाकडून यादी जाहीर करण्यास विलंब करण्यात येत होता. बंडखोरांना थोपविण्यासाठी ही खेळी केली जात असल्याचे बोलले जात आहे. तिकीटाच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांना अंतिम यादी कधी जाहीर होणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
निरोप न मिळालेले अस्वस्थ
पक्षाकडून प्रभागातील काहींना रविवारी दुपारी अचानक निरोप गेले. त्यामुळे अनेक इच्छुक आपले कामे पुढे ढकलून व प्रचारातून बाहेर पडले. काहींना पॅनलनिहाय तर, काहींना वैयक्तिक संपर्क करण्यात आले होते. त्याच वेळी दुसरीकडे इच्छुकदेखील आपल्याला निरोप येईल, या आशेने मोबाईलवर ॲक्टिव्ह होते; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत निरोप न मिळाल्याने इच्छुकांची अस्वस्थता वाढली.
सोशल मीडियावर थेट पॅनलच जाहीर
पक्षात अगदी आठवडाभरापूर्वी प्रवेश करणाऱ्या दिग्गजांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता थेट पॅनलच जाहीर करुन सोशल मिडीयावर फिरवले आहे. विशेष म्हणजे तिकीटासाठी रांग नको, म्हणून वरिष्ठांचे फोटो देखील वापरले आहेत. त्यामुळे तेथील इच्छुकांची पुरती गाळण उडाली आहे; मात्र पक्षाकडून अद्याप तिकीट जाहीर न झाल्याने त्यांना थांबवले असून, त्यांचा एक पाय पक्षात अन् दुसरा पाय बाहेर असे चित्र आहे.