प्रभाग क्रमांक : 1
पिंपरी : या प्रभागात भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, गणेश मळेकर, सोनम मोरे, शीतल यादव तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे तसेच, यश साने, विकास साने, साधना नेताजी काशिद अशी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये सामना होणार असल्याचे चित्र आहे.
आरक्षण जागेत बदल झाल्याने माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर या तिघांची संधी हुकली आहे. तर, कोरोना महामारीत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी त्याचे पुत्र राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष यश साने हे मैदानात आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तसेच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस व मनसे या प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. मतांचे यश कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे
अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, अवजड वाहनांची वर्दळ, अनधिकृत बांधकामे, दाट लोकवस्ती, वायू, जल व ध्वनी प्रदूषणाचा त्रास, वाढते अतिक्रमण, पाणीटंचाई, वारंवार वीज खंडित होणे, कचऱ्यांचे ढीग इत्यादी प्रमुख समस्यांनी या प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत; तसेच या परिसराला रेड झोनचा फटका बसल्याने शहरातील हा भाग दुर्लक्षित झाल्याने अद्यापही विकासापासून वंचित आहे. चिखली परिसरात दाट लोकवस्तीच्या मानाने नागरी सुविधा तुटपुंज्या आहेत. या भागांतील अनेक आरक्षण अद्याप विकसित झालेली नाहीत. त्यामुळे करदात्या नागरिकांना नागरी सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे शेवटचे टोक असलेल्या चिखली हा भाग अद्यापही ग्रामीण तसेच, औद्योगिक पट्ट्यातील परिसर आहे. देहू आणि आळंदीच्या मध्यावर हा भाग असल्याने या भागास टाळगाव-चिखली अशा नावानेही ओळखले जाते. एमआयडीसीतील कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. हाऊसिंग सोसायट्या, बैठी घरे, भाडेकरू असे संमिश्र मतदारांचा हा परिसर आहे.
भामा-आसखेड व आंद्रा धरणातून येणार अशुद्ध पाणी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करण्यात येते. तेथून त्या भागांत पाणीपुरवठा केला जात आहे. शंभर एमएलडीवरून हा केंद्र 300 एमएलडीवर क्षमतेचा करण्याचे काम सुरू आहे. येथेच श्री जगद्गगुरू संत तुकाराम संतपीठ हे मसीबीएससीफची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. तसेच, टाऊन हॉल हे सभागृह बांधण्यात आले आहे. काही रस्ते विकसित करण्यात आले आहेत. परिसरातील वाढत्या हाऊसिंग सोसायट्यांमुळे रस्ते खराब झाल्याने खड्डेमय रस्त्यांतून ये-जा करावी लागत आहे.