सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर File Photo
पिंपरी चिंचवड

भुशी दुर्घटना | प्रशासनाला अखेर जाग आली

आपत्तीप्रवणस्थळी उपाययोजना करा: सहआयुक्त इंदलकर यांची विभागप्रमुखांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका परिक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरिकेड्स लावावेत. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सर्व विभाग प्रमुख आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.

एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले

लोणावळा येथील भुशी धरणाजवळील एका धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. पुणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी झाली आहे. त्यास अनुसरुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महापालिका क्षेत्रात संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी तात्काळ आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

जाग आली पण इतक्या उशिरा का?

शहरातील नदी घाट, पूल, तलाव, बंधारे, उद्याने, खाणी अशा ठिकाणी नागरिक पावसाळी पर्यटनासाठी येतात. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. गरजेच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणे, तसेच धोकादायक झाडे, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक फलक, मनोरे, इमारती, विजेचे डी.पी.बॉक्स व ट्रान्सफार्मर संदर्भात संबंधित विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूर्व दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सह आयुक्त इंदलकर यांनी दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

सह आयुक्त इंदलकर म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच, शहरातून वाहणार्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांची पाणी पातळी वेळोवेळी तपासण्यात येत आहे.

आपत्कालीन प्रतिसाद पथक

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी 24 तास कार्यरत असलेले आपत्कालीन प्रतिसाद पथक (एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) स्थापन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT