Five members of the same family were washed away in Bhushi Dam on Sunday
रविवारी भुशी धरणात एकाच कुटुंबातील पांच जण वाहून गेली  पुढारी
पिंपरी चिंचवड

भुशी धरण दुर्घटना | बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह सापडले

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा : भुशी धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या धबधब्याच्या पाण्यासोबत रविवारी वाहत जाऊन धरणामध्ये बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला सोमवारी यश मिळाले आहे. बुडालेल्या पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह रविवारी हाती लागले होते. तर, उरलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सोमवारी सकाळी साडेदहा आणि सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले.

अंसारी कुटुंबातील पांच जण मृत्युमुखी

लोणावळ्यात मागील काही दिवसांपासून संततधारेमुळे भुशी धरण ओव्हरफ्लो होण्याचा अंदाज असल्याने हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे आले होते. त्यातच पुण्यातील अन्सारी कुटुंब हेसुद्धा वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात आले होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळणार्‍या धबधब्यावर अन्सारी कुटूंब गेले होते. या वेळी धबधब्याच्या पाण्याचा जोर वाढल्याने अन्सारी कुटुंबातील 9 जण वाहत्या पाण्याच्या मध्यभागी अडकून पडले.

या वेळी चार जणांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु, साहिस्ता लियाकत अन्सारी (37), अमिमा आदिल अन्सारी (13), मारिया अन्सारी (सात वर्षे), उमेरा आदिल अन्सारी (आठ वर्षे) व अदनान अन्सारी (चार वर्षे) हे पाण्याबरोबर वाहून गेले.

पाण्याचा वेग आणि धुक्यामुळे अडचण

या घटनेची खबर मिळताच लोणावळा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला बोलावून घेतले. याठिकाणी दाखल झालेल्या या बचाव पथकाने पहिल्या तीन तासांच्या बचाव कार्यात शाहिस्ता आणि अमिमा या दोघींचा मृतदेह शोधून काढला. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग तसेच परिसरात पसरलेले दाट धुके यामुळे बचाव कार्यात अडचण येत होती. दरम्यान, आयएनएस शिवाजीचे बचाव पथक आणि वन्यजीव संरक्षक दलाचे स्वयंसेवकदेखील त्याठिकाणी दाखल झाले. या सर्वांनी बचाव कार्य सुरू ठेवले.

काही वेळाने उमेरा अन्सारी हिचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. मात्र, तोवर अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळीच पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मारिया हिचा मृतदेहदेखील हाती लागला. मात्र, 4 वर्षीय चिमुरड्या अदनान याचा मृतदेह सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हाती आला.

दीड दिवस बचावकार्य सुरू

मुसळधार पाऊस, पाण्याचा वाढता प्रवाह व दाट धुके यासारख्या अडचणींचा सामना करीत तब्बल दीड दिवस राबवलेले हे बचाव कार्य शिवदुर्ग मित्र बचाव पथक, आयएनएस शिवाजीचे बचाव पथक आणि वन्य जीव संरक्षक दल यांच्या सदस्यांनी पूर्ण केले.

SCROLL FOR NEXT