भोसरी: भोसरीतील आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी पालिकेच्या वतीने वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु वाहनतळाचे उद्घाटन होऊनही वाहनतळ वाहनचालकांसाठी अद्यापही सुरू झालेले नाही.
वाहनतळ सुरू झाल्यावर भोसरीतील आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यास मदत होणार आहे. पालिकेचे वाहनतळ कधी सुरू करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आळंदी रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. श्री ज्ञानेश्वर (माऊलीदादा) सोपानराव गवळी वाहनतळाची निर्मिती करण्यात आली. (Latest Pimpari chinchwad News)
पालिकेने चार मजली वाहनतळ उभारले आहे. या वाहनतळात दीडशे दुचाकीबरोबरच 75 चारचाकी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे वाहनतळ सुरू झाल्यावर वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
भोसरीतील गवळी वाहनतळ हे शहरातील पहिले चार मजली वाहनतळ आहे. पालिकेच्या ई प्रभागाच्या स्थापत्य विभागाद्वारे या वाहनतळाचे काम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आले.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे या वाहनतळाचे स्थापत विभागाद्वारे भूमी जिंदगीकडे होणारे हस्तांतर रखडले होते. त्यामुळे वाहनतळाचे काम पूर्ण होऊनही ते दहा महिन्यांनंतरही सुरू होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. ग्राहक आणि दुकानदारांनी दुकानासमोरील रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांमुळे वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना नागरिक आणि ग्राहकांना करावा लागत आहे.
उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने वाहनतळाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराची कचराकुंडी झाली आहे.
वाहतूक कोंडीने नागरिक, वाहनचालक त्रस्त
भोसरी-आळंदी मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. येथील अरुंद रस्ता आणि रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहनांची पार्किंग यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे भोसरी परिसरातील नागरिक तसेच दिघी, चर्होली, मॅग्झिन चौक, साई मंदिर परिसरात प्रवास करणारे वाहनचालक देखील त्रस्त आहेत. काही मनिटांच्या प्रवासासाठी तास, अर्धातास खर्च करावा लागत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने वाहनतळ सुरू केल्यास येथील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
भोसरीतील वाहनतळाच्या हस्तांतरणाच्या कागदपत्रामधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. या वाहनातळाचे हस्तांतरण महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाकडे करण्यात आलेले आहे.-शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), इ प्रभाग.
भूमी जिंदगी विभागाद्वारे भाडेनिश्चितीसाठीचा प्रस्ताव पालिकेच्या नगररचना विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यावर वाहनतळ सुरू करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर हे वाहनतळ सुरू होईल.- सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी जिंदगी