संग्राम थोपटे यांचा बालेकिल्ला सर करण्याचे मोठे आव्हान  File Photo
पिंपरी चिंचवड

विधानसभेचे पडघम : थोपटेंच्या गडात महायुतीचा लागणार कस

अजित पवार कसे डावपेच खेळतात, यावर लढत रंगणार

पुढारी वृत्तसेवा

अर्जून खोपडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभेतील 47,381 या मताधिक्याच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकाचे 43,805 मतांचे मताधिक्य देणार्‍या भोर-वेल्हा-मुळशी या मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे यांचा अभेद्य बालेकिल्ला विधानसभेला सर करण्याचे मोठे आव्हान या वेळी महायुतीसमोर आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पराभव झाला आहे. त्यामध्ये थोपटे यांनी जिवाचे रान करून सुप्रिया सुळे यांना भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात दिलेल्या मताधिक्याचा मोठा वाटा आहे. हा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला असल्यामुळे या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आता ते घेणार असल्याने ते मोठे आव्हान आ. संग्राम थोपटे यांच्यासमोर आहे. थोपटे यांच्या ताब्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेने मंजूर केलेले कर्ज ऐनवेळी अडवून अजित पवार यांनी आपल्या कुरापतीची चुणूक थोपटे यांना दाखवून दिली आहे. आगामी काळात अजित पवार कसे आणि किती डावपेच करतात, यावर येथील लढत रंगणार आहे.

भोर, वेल्हे, मुळशी मिळून भोर विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघावर थोपटे घराण्याचे संपूर्ण वर्चस्व राहिलेले आहे. सन 1972 मध्ये प्रथम ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळविला होता. त्यानंतर 1980 व 1999 चा अपवाद वगळता थोपटे यांनी तब्बल आठ निवडणुका लढविल्या आणि सहावेळा विजय मिळविला आहे. सन 2009 ते 2019 पर्यंत तीन निवडणुकांत त्यांचे पुत्र आमदार संग्राम थोपटे यांनी सलग विजय मिळविला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत थोपटे यांचे मताधिक्य कमी कमी होत आहे, ही चिंतेची बाब असली, तरी या वेळी लोकसभेला त्यांनी याच मतदारसंघातून त्यांना विधानसभेला गेल्या वेळी मिळालेल्या मताधिक्याच्या जवळपास चौपट मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळवून दिले, ही थोपटे यांना दिलासा देणारी बाब असेल.

आगामी निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्याशी विरोधी महायुतीची सरळ लढत झाल्यास ती अत्यंत चुरशीची होईल, महायुतीतील इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरी होऊन तिरंगी-चौरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने तसे झाल्यास आ. थोपटे यांना निवडणूक सोपी होऊ शकते. निवडणूक तोंडावर आली असली, तरी राजकीय वातावरण अद्याप तापलेले नाही. गेल्या 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम थोपटे, तर शिवसेना-भाजप युतीकडून कुलदीप कोंडे यांच्यात सरळ लढत झाली होती. त्या वेळी कोंडे यांना 9,206 मतांच्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. आता ही सरळ लढत झाल्यास आ. संग्राम थोपटे यांना पुन्हा मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल

महायुतीतील भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणत्या पक्षाकडे कोणाकडे जाते, यावरून उमेदवारांच्या विजयाची दिशा ठरणार आहे. जागा वाटपात ही जागा शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) की भाजपला? हाच मोठा प्रश्न आहे. विरोधकांची ताकद विभागली असून, काँग्रेस मात्र अद्याप एकसंध आहे. ऐनवेळी काय डाव पडतील, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. सर्व विरोधक एकवटून येथे गडाला धक्का देणार की काँग्रेस विजयाचा चौकार मारणार, हे आगामी निवडणुकीतच कळणार आहे.

महायुतीमधील शहर व तालुक्यातील कोणत्याही नेत्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपकडून किरण दगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून इच्छुक असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवानेते विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, चंद्रकात बाठे, शिवसेने (एकनाथ शिंदे गट) कडून बाळासाहेब चांदेरे, कुलदीप कोंडे, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून शंकर मांडेकर हे काय भूमिका घेणार, यावरून चित्र स्पष्ट होणार आहे. या उलट महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हेच प्रमुख दावेदार असणार आहेत.

शिवसेना पक्षात दोन गट झाल्यावर पहिल्यांदा बाळासाहेब चांदेरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला, ही चांदेरे यांच्या उमेदवारीसाठी मोठी जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुलदीप कोंडे यांनी शिंदे गटात प्रवेश करून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी काशी यात्रा व विविध शिबिरे आयोजित करून अप्रत्यक्ष निवडणुकीची तयारीच सुरू केली आहे.

गेल्या तीन निवडणुकांतील चित्र

1) सन 2009 :

आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार शरद ढमाले व अपक्ष मानसिंग धुमाळ यांच्यात तिरंगी लढत झाली. 2,84,384 मतदारांपैकी 1,89,744 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार संग्राम थोपटे यांना 59041 (31.12 टक्के), शरद ढमाले 40462 (21.32 टक्के), तर मानसिंग धुमाळ यांना 33 हजार मते मिळाली होती. या तिरंगी लढतीत आमदार थोपटे यांनी 18580 मतांनी पहिल्यांदा विजय मिळविला होता.

2) सन 2014 :

कुलदीप कोंडे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने शरद ढमाले यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्या वेळी एकूण 3,18,160 मतदारांपैकी 2,18,602 जणांनी हक्क बजावला. आमदार संग्राम थोपटे काँग्रेस 78602 (35.96 टक्के), कुलदीप कोंडे शिवसेना 59,651 (27.29 टक्के), विक्रम खुटवड राष्ट्रवादी 50,165 (22.95 टक्के) मते मिळाली. तिरंगी लढतीत संग्राम थोपटे हे 18951 मतांनी विजय मिळवून दुसर्‍यांदा आमदार झाले.

3) सन : 2019

आ. संग्राम थोपटे आणि कुलदीप कोंडे यांच्यात दुसर्‍यांदा दुरंगी लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत एकूण 3,61,764 मतदानापैकी 2.28.264 मतदान झाले. आमदार थोपटे यांना 108925 म्हणजेच 47.72 टक्के मतदान झाले, तर कोंडे यांना 99716 म्हणजे 43.69 टक्के मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या या लढतीत अवघ्या 9206 मतांनी आमदार थोपटे यांनी विजय मिळवत हॅटि्ट्रक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT