Bhama Askhed Water Project Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhama Askhed Water Project: भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प पुन्हा रखडला; इंद्रायणीतील काम पावसाच्या धोक्यात

देहूगाव येथील नदीपात्रातील कामावर पावसाचे सावट; मुदतीत प्रकल्प पूर्ण होणार का यावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून बंद जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हे काम करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. परंतु, अजूनही यंदा काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शाशंकता आहे.

तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, सध्या मान्सूनजवळ येत असल्याने पावसाळ्यात दुधडी भरून वाहणारी इंद्रायणीत काम करणे शक्य होणार आहे का, असा प्रश्न नागरिक करत आहेत. जे काम केले आहे तेदेखील पाण्यात वाहून जात की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या या कामावर पावसाचे सावट दाटू लागले असून, पावसाळा तोंडावर असताना कामाची गती आणि पूर्णत्वाबाबत नागरिकांमध्ये तीव साशंकता निर्माण झाली आहे. नदीतील पाण्याच्या पातळीपासून तब्बल 25 फूट खाली मातीचा भराव टाकून पाणी अडविणे व भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

या कामासाठी पुन्हा नव्याने ठेका

भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, दीर्घकाळ रखडलेल्या या कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही अपेक्षित गती मिळाली नाही. पूर्वीच्या ठेकेदाराकडून काम पूर्ण न झाल्याने उर्वरित सुमारे 30 टक्के कामासाठी नव्याने ठेका देण्यात आला. 10 एप्रिल रोजी कार्यादेश देण्यात आला असून, नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मागील वर्षाची पुनरावृत्ती होणार का?

देहूगाव येथे इंद्रायणी नदीत सुमारे 110 मीटर लांबीच्या पात्रात गेल्या दहा-बारा दिवसांपासून मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाची चाहूल लागल्याने हे काम वेळेत पूर्ण होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गतवर्षी याच ठिकाणी सुरू असलेले काम पावसामुळे विस्कळीत झाले होते. नदीपात्रातील मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने कामाची गती मंदावली होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

10 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस

हे काम 20 मेपासून सुरू करण्यात आले आहे. तर 10 जूनपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही व्ही. एम. जावळे कन्स्ट्रक्शनचे संचालक व्ही. एम. जावळे यांनी दिली आहे. मात्र, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास कामाच्या मुदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कामाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT