पिंपरी: हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र गेल्या आठवड्यातील पावसाच्या दणक्याने रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे.
हिंजवडी आयटी पार्क टप्पा 1 ते 3 मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्डयातून वाहनचालकांना कसरत करुन वाहन बाहेर काढावे लागले. खड्डे, मेट्रोच अपूर्ण कामे अन् अरुंद रस्ते यामुळे आयटीन्सने संताप व्यक्त केला. या अनागोंदी कारभारानंतर आता पीएमआरडीए आणि एमआयडीसी विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे दिसून येत आहे. (Latest Pimpri News)
मागील आठवडाभर झालेल्या पावसाने हिंजवडी आयटीपार्क परिसराला वॉटरपार्कचे स्वरूप आले. यामुळे आयटीयन्सची वाहने पाच ते सहा तास कोंडीत अडकली होती. फेज श्री वरून वाकडला पाच सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच तास खर्च करावे लागत होते. त्यामुळे संतप्त आयटी कर्मचार्यांनी संबंधति प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला.
माण- मारुंजीच्या डोंगर माथ्यावरून आलेले पावसाचे पाणी ओढ्या-नाल्याने थेट आयटीपार्क परिसरात उतरल्याने फेज तीनकडे जाणार्या मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, अपूर्ण कामे आणि खचलेला रस्ता यामुळे हे पाणी साठून राहिले. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरून गुडघ्याएवढे पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. तर अनेकांच्या मोटारी रस्त्यांतच बंद पडल्या.
एमआयडीसी तसेच काही विकासकांनी या भागात विकास करताना पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून सपाटीकरण केले. तर काही ठिकाणी नाले गायब केले. त्यामुळे फेज थ्रीकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने परिसरातील सर्व मोर्या बंद केल्या. परिणामी, रस्त्यावर नदी- नाल्यांचे स्वरुप आले होते.
दरम्यान, हिंजवडी आयटी पार्कमधील मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्याबाबत आलेल्या पुराबाबत एमआयडीसी व पीएमआरडीएच्या अधिकार्यांना विचारणा केली असता हे दोन्ही विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. एमआयडीसीचे अधिकारी म्हणतात की, या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने त्यांनी उभ्या केलेल्या लोखंडी बॅरिगेट्सला पाणी आडले जाते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते.
‘वर्क फ्रॉम होम’ची वेळ
पहिल्याच पावसात हिंजवडी आयटीची अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे कंपन्यांना कर्मचार्यांकडून वर्क फ्रॉमची मागणी आता होऊ लागली आहे. पावसामुळे घरातून कंपनीत पोचणे आणि तिथून पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करत घर गाठावे लागते. रस्त्यावरच नाहक तासन्तास गेल्याने मनस्तापाची वेळ येते.
‘एमआयडीसी’चे दुर्लक्ष
एमआयडीसीने पावसाळापूर्व कामे पूर्ण करणे आवश्यक होते. येथील कामासाठी एमआयडीसीला पीएमआरडीएने तब्बल 88 लाख रुपये दिले आहेत; मात्र पावसाचे कारण सांगून त्यांच्याकडून कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत.
परिणामी, आयटी पार्कमधील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली. दरम्यान, पोलिस विभागाने देखील याबाबत पत्र दिले होते; परंतु त्याचीही कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून आले. याबाबत कार्यकारी अभियंता संजय इंदुले यांच्याशी संपर्क साधला असता तोहोऊ शकला नाही.
आयटी पार्कमधील समस्यांबाबत आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, पीएमआरडीने त्याठिकाणी दुरुस्ती हाती घेतली आहे. तसेच, मेट्रोच्या संबंधितांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, माण रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग काम करणार होते. मात्र, आता पीएमआरडीए 140 मीटरचे डांबरीकरणाचे काम करणार आहे.- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए