पिंपरी: तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील ग्रामदैवत श्री हनुमान यांचा यात्राउत्सव श्री हनुमान जयंती पासून सुरु असून गुरुवारी(दि.१७)यात्रा आहे. यावेळी श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होत असते. तसेच श्रींची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा सोहळा मंदिरा समोरुन रात्रीच्यावेळी निघून परत मंदिरात येत असतो यामध्येही अनेक भाविक सहभागी होत असतात असे असताना मंदिर परिसरातील तळेगाव स्टेशन चौक ते एसटी बसस्थानक,रेल्वे स्टेशन या मार्गावरील खड्डे प्रशासनाने बुजविले नाहीतच परंतु खडी आदी रोडराडाही काढला नाही. यामुळे यात्रेसाठी खेळण्याची आदी दुकाने लावण्यासही अडथळे येत आहेत.
तसेच अवकाळी पावसामुळे या रस्त्याची आणखी दुरवस्था झालेली आहे.यामुळे रोज नागरिकांना,वाहन चालकांना त्रासदायक होत आहेच परंतु यात्रा कालावधीत भाविकांना त्रासदायक होण्याची शक्यता आहे.तसेच पालखी प्रदक्षिणाच्या सोहळ्याच्या वेळीही त्रासदायक होण्याची शक्यता आहे. तरी मंदिर परिसरातील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत आणि रोडराडा तातडीने काढण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.