मुख्यालयासाठी २० हेक्टर जागेस मंजुरी File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpari | मुख्यालयासाठी २० हेक्टर जागेस मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी अखेर जागा देण्याबाबत राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताथवडे येथील वळूमाता केंद्र प्रक्षेत्र येथील २० हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे.

तसेच, काळेवाडी, बावधन, संत तुकाराम नगर आणि दापोडी या पोलिस ठाण्यांनादेखील मंजुरी देण्यात आली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (दि. ९) उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर पोलिसांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर गुरुवारी लगेचच जागेसह पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाल्याने पोलिस वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड व मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाला मंजुरी दिली. त्या वेळी चिंचवड येथे महापालिका शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. निगडी येथील शाळेत मुख्यालय सुरू करण्यात आले.

दरम्यान, मोशी येथील नऊ एकर जागा आयुक्तालयासाठी मिळाली. मात्र, मुख्यालयासाठी जागेचा प्रस्ताव धूळखात होता. राज्याच्या पशुसंवर्धन व विकास विभागाचे ताथवडे येथे वळूमाता केंद्र प्रक्षेत्र आहे.

या केंद्रातील २० हेक्टर जागा शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पोलिस आयुक्तालयाने प्रस्तावित केली होती. दरम्यान, काही वर्षांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली आहे.

वरिष्ठ पातळीवरून हलवली सूत्रे

पोलिस आयुक्त चौबे यांनी केवळ प्रस्ताव सादर केला नाही. याचा पाठपुरावा करण्यासाठी जबाबदारी निश्चित करून वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवली. ज्यामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी श्वानपथक,

देहू येथे पोलिसांचे विश्रामगृह, आयुक्तालय प्रशासकीय इमारतीसाठी मोशी येथे ९ एकर जागा, पोलिस अधिकारी निवासस्थानासाठी कस्पटेवस्ती येथे १५ एकर जागा, तसेच पोलिस मुख्यालयासाठीही ५० एकर जागा उपलब्ध झाली.

मुख्यालयाच्या जागेत काय होणार

  • पोलिस भरती,

  • परेड मैदान मुख्यालय इमारत

  • पोलिस रुग्णालय

  • पोलिस पाल्यांसह इतरांसाठी शाळा

  • पोलिस शस्त्रागार

  • श्वान पथक बॉम्बशोधक

  • नाशक पथक

  • जलद प्रतिसाद पथक

  • मोटार परिवहन विभाग अंतर्गत 'फायर रेंज'

  • पोलिस उपायुक्त मुख्यालय कार्यालय

  • बहुउद्देशिय सभागृह

  • बंदोबस्तावरील पोलिसांचे विश्रामस्थान इतर अनुषंगिक कार्यालये

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी काही प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. नुकतेच आयुक्तालय आणि मुख्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे. या जागेमुळे पोलिस आयुक्तालयाची प्रशस्त इमारत आणि मुख्यालय उभारले जाणार आहे. तसेच, चार ठाण्यांना देखील मंजुरी मिळाली आहे. या बाबींसाठी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT