पंकज खोले
पिंपरी: चार वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये समाविष्ट करण्यात आले. या समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेनंतर नागरिकांना जुने दस्त, नोंदणी, मंजुरी व इतर कागदपत्रे मिळविताना नागरिकांची मोठी दमछाक होत आहे.
अर्जदारांना कागदपत्रे मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. पीएमआरडीए आणि जुने पीएसएनटीडी या दोन्हीचे वेगळे रेकॉर्ड रुम असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Pimpri News)
पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात जुने दस्त, कागदपत्रे आहेत; मात्र हे कार्यालय आकुर्डी येथे आल्यानंतर सर्व कागदपत्रे प्राधिकरणाच्या कार्यालयात हलविली. पीएमआरडीएच्या स्थापनेपासून म्हणजेच दहा वर्षांपूर्वीपासून तसेच, त्यापूर्वीचे काही कागदपत्रे या कार्यालयात आहेत. जवळपास 50 हजार फाईली असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. तर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना 1972 आहे.
तेव्हापासून जमीनसंदर्भात व गृहप्रकल्पातील आठ ते दहा हजार फाईली या रेकॉर्ड रुममध्ये आहेत. दरम्यान, अर्जदारांना हवे असलेली नेमकी माहिती अथवा जुने दस्त मिळत नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. काही भाग हा महापालिकेच्या ताब्यात गेला असल्याने त्या संबंधित कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.
अर्ज फिरतो टेबलावरतीच
प्रत्यक्षात, अर्ज केल्यानंतर माहिती मिळत नसल्याने नागरिकांना वेगवेगळ्या विभागात हेलपाटे मारावे लागतात. संबंधित विभागात अर्ज केल्यानंतर त्या विभागातून रेकॉडरुमला कळविणे अपेक्षित असते. मात्र, तो अर्ज वेगवेगळ्या टेबलवर फिरत असतो. त्या विभागातून संंबंधित रेकॉर्डरुमपर्यंत येण्यास बराच वेळ लागतो. परिणामी, अर्जदार कंटाळून जातात.
पीसीएनटीडीएच्या अभिलेख कक्षाला कुलूप
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा रेकॉर्ड कक्ष हा स्वतंत्र असून, तो वाहनतळाच्या ठिकाणी आहे. प्रत्यक्षात या कक्षामध्ये नागरिकांनी थेट प्रवेश करू नये, यासाठी कुलूप लावले आहे. ‘पुढारी’ प्रतिनिधीच्या पाहणीदरम्यान कक्षातील कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते. दरम्यान, या ठिकाणी कोणतेच अर्ज येत नसून, संबंधित विभागाशी संपर्क करा, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.
प्राधिकरणच्या रेकॉडरुमची स्थिती
एकूण नस्त्यांची संख्या 1,01,879
स्कॅनिंग केलेल्या नस्त्यांची संख्या 24,528
नष्ट केलेल्या नस्तांची संख्या 8,754
दररोज प्राप्त होणारे अर्ज 10 ते 15
पीएमआरडीएचे सर्वच कागदपत्रे, दस्त एकाच ठिकाणी आहेत. अर्ज दिल्यानंतर लगेचच संबंधित कागदपत्रे मिळावीत, याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच, त्या ठिकाणी स्वतंत्र अधिकारीदेखील नेमला आहे.- सुनील मरळे, संचालक, विकास परवानगी विभाग, पीएमआरडीए
अर्ज केल्यावर संबंधित विभागात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, तरीही मिळत नाही. रेकॉर्डरूममध्ये कर्मचारी नसतो. मी वर्षापासून आतापर्यंत तीनवेळा अर्ज केले आहेत. मात्र अजूनही कागदपत्रे मिळाली नाहीत. कागदपत्रांसाठी मला हेलपाटे मारावे लागत आहेत.अरुण घिया, अर्जदार.