Akurdi Traffic Signal Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Traffic Signal Issue: आकुर्डी म्हाळसाकांत चौकात सिग्नल बंद; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

दोन दिवसांपासून यंत्रणा ठप्प; अपघाताचा धोका वाढला, तातडीच्या उपाययोजनेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

आकुर्डी: म्हाळसाकांत चौकातील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा दोन दिवसांपासून बंद आहे. या चौकातील सिग्नल यंत्रणा बंद झाल्यानंतर वाहतूक विभागाने येथे पोलिस नियुक्त करणे गरजेचे होते. परंतु दोन दिवसांपासून ना सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली ना वाहतूक पोलिस नियुक्त केला. यामुळे चौकात वाहतूक कोंडी होत असून लहान मोठे अपघात घडत आहेत. यामुळे संबंधित विभागाने येथील सिग्नल यंत्रणा त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक नियंत्रण करणारी सिग्नल व्यवस्था सलग दोन दिवसांपासून बंद असल्याने आकुर्डी, निगडी, चिंचवड या भागांना जोडणारा मध्यवर्ती ठिकाणचा चौक म्हणून म्हाळसाकांत चौक ओळखला जातो. या चौकात सातत्याने चारही बाजूने वाहनांची गर्दी असते. जवळच म्हाळसाकांत विद्यालय, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, सीएमएस विद्यालय, सरस्वती विद्यालय, गुरुगणेश विद्यालय असे अनेक शाळा, महाविद्यालये असून, या ठिकाणी सातत्याने विद्यार्थ्यांची व पालकांची ये-जा सुरू असते. त्याचबरोबर शाळा सुट्‌‍ते वेळी व भरतीवेळी मोठ्या प्रमाणात पालक- विद्यार्थी, खासगी वाहने, विद्यार्थी वाहतूक बस यांची गर्दी असते.

म्हाळसाकांत चौकातून निगडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, चिंचवड, आकुर्डी गावठाण या ठिकाणी जाण्यासाठी या चौकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गेले दोन दिवसांपासून या चौकातील वाहतूक सिग्नल व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडतात. मात्र वाहतूक विभागाने येथे कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही. शनिवार आणि रविवार शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याकारणाने वाहतूक कोंडी काहीशी नियंत्रणात होती. मात्र, हीच परिस्थिती सोमवारी राहिली तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. यासाठी वेळीच उपाययोजना करून वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाने कार्यवाही करून स्वयंचलित वाहतूक यंत्रणा सुरळीत करावी,अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व स्थानिक वाहनचालकाकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT