Fake Notes Pimpri
पिंपरी चिंचवड

Fake Notes: बनावट नोटांचे बंडल देऊन कार पळवली; टोळीच्या चाकण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपींकडून 42 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश ज्ञानदेव ठाकरे (21) आणि समीर दिनकर महल्ले अशी आरोपींची नावे आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भारतीय चलनातील पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल देऊन कार पळवली ; मात्र चाकण उत्तर पोलिसांनी वेळीच हालचाल करत फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत काही तासांतच गुन्ह्याचा पर्दाफाश केला. आरोपींकडून 42 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश ज्ञानदेव ठाकरे (21) आणि समीर दिनकर महल्ले अशी आरोपींची नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुजेब फिरोज बागवान (26, रा. बारामती) हे त्यांच्या मित्राची कार विकण्यासाठी पुण्यात आले होते. दरम्यान, आरोपी गणेश ठाकरे याने मोबाईलवरून संपर्क साधून गाडी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली.

चाकणमधील माणिक चौक येथे त्यांचा व्यवहार ठरला. आरोपीने कारची 3 लाख 50 हजार किंमत ठरवून त्यापैकी 3 लाख रुपये रोख स्वरूपात 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये दिले. हे बंडल प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले होते. उर्वरित 50 हजार रुपये नाव ट्रान्सफर झाल्यावर देण्याचे आश्वासन देत आरोपी कार घेऊन पसार झाला.

फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी बंडल उघडून पाहिले असता, वरची व खालची नोट खरी तर मधील सर्व नोटा बनावट असल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बागवान यांनी तातडीने चाकण उत्तर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन मोरखंडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे काही तासांतच आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली. आरोपींकडून फसवणुकीत वापरलेली अल्टो कार, 42 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच नोटांचे बंडल तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT