पिंपरी: विरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा नाही. निवडणुका हारल्यानंतर मत चोरीच्या आरोपात काहीही तथ्य नाही. या अशा आरोपाआडून खोटे कथानक पसरविण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, तेलंगणा या राज्यात विरोधकांची सत्ता आहे. तिथे मतदारयादी, मतदान यंत्रे चांगली होती, त्यावेळी विरोधकांना मतचोरी झाल्याचे दिसले नाही का, त्यावेळी ते का बोलले नाहीत. त्यांची मते वाढली नाहीत का, मतांची चोरी झाली नाही का, त्यामुळे विरोधकांनी पराभव मान्य केला पाहिजे. (Latest Pimpri News)
काम करणार्याला फरक पडत नाही
भौगोलिक सलगतेनुसार प्रभाग रचना तयार केली आहे. मतदारांशी संपर्क, बोलणे, चालणे व्यवस्थित असेल तर कोणत्याही पद्धतीने प्रभाग रचना झाली तरी काम करणार्या व्यक्तीच्या पाठीशी मतदार उभा राहतो. त्यामध्ये फार विचार करण्याची गरज नाही, असे पवार यांनी सांगितले.
मराठा आंदोलकांशी चर्चा सुरू
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.