संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी हवी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आग्रही मागणी Pudhari
पिंपरी चिंचवड

Plastic Ban: संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी हवी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आग्रही मागणी

अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांना मतदान करू नका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: प्लास्टिकच्या अतिवापरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे. महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी व इतर पर्यटनस्थळी प्लास्टिक बंदी केली आहे. संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबाजवणीबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने आग्रह धरत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्लास्टिकच्या बाटल्यामधून पाणी पिल्याने त्याचे कण शरीरात जातात; तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा समुद्रात जमा झाला आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करावा. संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीसाठी मी आग्रह धरला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.  (Latest Pimpri News)

हिंजवडी, चाकणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना

हिंजवडी, चाकण या भागातील वाहतूक कोंडीत सापडत असलेल्या नागरिकांची सहनशीलता संपली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. येत्या 50 वर्षांचे नियोजन करीत आहोत. आवश्यक तेथे दुमजली उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत, असे पवार म्हणाले.

निवडणुकीत टी. एन. शेषन सारखे अधिकारी हवेत

निवडणूक आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष टी. एन. शेषन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. शेषन यांनी निवडणुकांसंदर्भात कठोर निर्णय घेत सर्वांना सुतासारखे सरळ केले. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी होते. अशा अधिकार्यांची आताही गरज असल्याचे ते म्हणाले.

अन् दादा दचकले :

अजितदादा भाषण करत असताना व्यासपीठावरील बाजूच्या वीज वायरमधून स्पार्क झाल्याचा आवाज आला, त्यामुळे दादा दचकले. ते काही क्षण स्तब्ध झाले होते. थोडा वेळानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केले. कार्यक्रमात कोणताही व्यत्यय आला नाही; मात्र दादांचे सुरक्षारक्षक अधिकच सतर्क झाले.

अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांना मतदान करू नका

न्यायालयाच्या निर्णयानुसार बारामतीमध्ये अनधिकृत फ्लेक्सला बंदी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही फ्लेक्स बंदी करा. माझा व देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच वेळी असल्याने काही जण माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फ्लेक्स लावत शुभेच्छा देतात. त्यात आमच्या दोघांपेक्षा शुभेच्छा देणार्यांचा फोटो मोठा असतो. अशा फ्लेक्सवरही कारवाई करा. काम करत नसल्याने शहरभरात मोठ्या संख्येने फ्लेक्स लावले जातात. जो काम करतो त्याला फ्लेक्स लावायची गरज नसते. अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी करणार्यांना मतदान करु नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT