Pimpri News: मोबाईल तंत्रज्ञान अधिक प्रगत आणि वेगाने विकसित होत असून, मोबाईलमध्ये ‘एआय तंत्रज्ञान’ अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामुळे फोटो मॉर्फिंगसह अनेक कामे सोपी झाली आहेत.
मात्र, एआयमुळे सहज सोप्या पद्धतीने होणार्या फोटो मॉर्फिंगसंदर्भातील गुन्ह्यांच्या तक्रारींची वाढती संख्या पाहता पोलिसांच्या सायबर विभागासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या महिनाभरात मॉर्फिंगच्या सुमारे पन्नास ते साठ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सायबर तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
फोटो मॉर्फिंगच्या तक्रारी रोज
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठ महिन्यात सायबर चोरट्यांनी नागरिकांच्या तब्बल सव्वाशे कोटींच्या रकमेवर डल्ला मारला आहे. या व्यतिरिक्त हॅकिंगचे गुन्हे देखील झपाट्याने वाढू लागले आहेत. फोटो मॉर्फ करून बदनामी, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी दररोज किमान दोन तक्रारी येत आहेत. यातच आता एआयने मॉर्फिंग सोपे करून दिल्याने या प्रकारचे गुन्हे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुष्पगुच्छाऐवजी येतोय मद्याचा प्याला
मोबाईलमध्ये असणार्या तंत्रज्ञानामुळे फोटो मॉर्फिंग करणे सोपे झाले आहेत. एखाद्याचा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो एडिट करून पुष्पगुच्छ ऐवजी हातात मद्याचा प्याला ठेवता येतो. यासह अनेक आक्षेपार्ह बदल एका क्लिकवर करता येतात. यापूर्वी अशा प्रकारे मॉर्फिंग करण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला जात असे; मात्र जाणकार मंडळीच त्याव्दारे मॉर्फिंग करू शकत होती. आता मोबाईलमध्ये आलेल्या एआय सुविधेमुळे कोणीही एका क्लिकवर फोटो मोर्फिंग करू शकते. जे पुढील काळात धोकादायक ठरणार आहे.
बदनामीसाठी वापर
‘एआय’च्या मदतीने केलेली मॉर्फिंग सहजपणे ओळखता येत नाही. फोटो एडिट करताना एआयकडून अनेक छोटे छोटे बदल आपोआप केले जातात. सध्या प्रत्येकाचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये बदल करून बदनामी देखील केली जाऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना यापुढे अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
एआय जनरेटेड कंटेट
एआयच्या मदतीने एडिट केलेल्या फोटोच्या खाली एआय जनरेटर कंटेंट असा मार्क येतो. मात्र, फोटोखाली अगदी कोपर्यात असलेला हा मार्क फोटो क्रॉप किंवा इतर टूलच्या मदतीने सहजरित्या घालवता येतो. ज्यामुळे फोटो एडिट आहे, की खराखुरा, हे समजत नाही.
एआय म्हणजे काय ?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित ही जगभरात वापरली जाणारी ही टेक्नॉलॉजी आहे. मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशिन्समध्ये आणि तिच्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे हे तंत्र आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रांत वापर केला जातो आहे. मोबाईलमध्ये असलेल्या एआय तंत्रज्ञानामुळे किचकट कामे सोपी झाली आहेत.
फोटो ‘मॉर्फ’ करून बदनामी किंवा फसवणूक केल्याच्या सायबर विभागाकडे दररोज तक्रारी येत आहेत. यातच आता मोबाईलमध्ये आलेल्या एआयच्या मदतीने फोटो मॉर्फिंग करणे सोपे झाले आहे. मात्र, याचा दुरूपयोग होण्याची जास्त शक्यता आहे. एखाद्याचा फोटो आक्षेपार्ह पद्धतीने मॉर्फ करून व्हायरल करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे फोटो एडिट करण्यासाठी एआयचा वापर करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.- प्रवीण स्वामी, सहायक निरीक्षक, सायबर विभाग, पिंपरी-चिंचवड