राष्ट्रवादी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह  (file photo)
पिंपरी चिंचवड

निवडणुकीनंतर मावळात राष्ट्रवादी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह मोडवर!

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची नियुक्ती करण्यात आली असून, एकप्रकारे यामुळे संघटनात्मक घडामोडींना सुरुवात झाली आहे.

मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच बैठक झाली. या बैठकीत ही कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. या कोअर कमिटीत आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, नामदेव दाभाडे, दीपक हुलावळे, महादू कालेकर, नामदेव ठुले, भरत येवले, काळुराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, संदीप आंद्रे, साहेबराव कारके, नारायण ठाकर, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, प्रकाश हगवणे, जीवन गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही मावळ तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाने आमदार शेळके यांना उमेदवारी दिली आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही विभागले गेले आणि राज्यात फूट पडूनही एकसंध राहिलेल्या मावळ तालुका राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. दरम्यान, निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पक्षाच्या ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांची बैठक होऊन कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने कोअर कमिटीच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीला सुरुवात झाली असल्याचे दिसते.

विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. आगामी सर्व निवडणुका आणि पक्ष संघटना या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णयासाठी ही कमिटी मार्गदर्शन करणार असल्याचे आमदार शेळके व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT